नागपूर : भात उत्पादक शेतकऱ्यांना 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानीसाठी प्रति हेक्टरी 6 हजार 800 रुपये ते 23 हजार 250 रुपये इतकी मदत मिळणार आहे. तर बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 6 हजार 800 रुपये ते 37 हजार 500 रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे.
राज्यात बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकरी, नुकसानग्रस्त धान उत्पादक शेतकरी आणि ओखी वादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी विधानसभेत मदत जाहीर केली. बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांचा मुद्दा या अधिवेशनात चांगलाच गाजला होता.
कोरडवाहू आणि बागायती भात पीक
कोरडवाहू भात उत्पादक शेतकऱ्यांना एनडीआरएफमार्फत 6 हजार 800 रुपये, तर पीक विम्यांतर्गत 1 हजार 170 रुपये मदत दिली जाईल. अशी एकूण 7 हजार 970 रुपये मदत मिळेल. बागायत भात पीकास एनडीआरएफमार्फत 13 हजार 500 रुपये तर पीक विम्यांतर्गत 1 हजार 170 रुपये मदत दिली जाईल. अशी एकूण 14 हजार 670 रुपये मदत बागायत भात पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळेल.
नापेर क्षेत्रातील भात रोपवाटीका
नापेर क्षेत्रातील भात रोपवाटीकेसाठी एनडीआरएफमार्फत 13 हजार 500 रुपये, तर विम्यांतर्गत 9 हजार 750 रुपये मदत दिली जाईल. अशी एकूण 23 हजार 250 रुपये मदत नापेर क्षेत्रातील भात रोपवाटीकांना मिळणार आहे. भाताच्या नापेर क्षेत्रासाठी पीक विम्यांतर्गत 9 हजार 750 रुपये मदत देण्यात येईल. धानाला 200 रुपये प्रति क्विंटल बोनस दिला जाईल. हा बोनस 50 क्विंटलच्या मर्यादेत दिला जाईल, अशी घोषणाही फुंडकर यांनी केली.
बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादकांसाठी मदत
कोरडवाहू कापूस उत्पादकांना शेंदरी बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीपोटी एनडीआरएफमार्फत 6 हजार 800 रुपये, पीक विमा 8 हजार रुपये आणि कापूस नियंत्रण कायद्यांतर्गत कंपन्यांकडून मिळणारी 16 हजार रुपयांची मदत दिली जाईल. अशी एकूण साधारण 30 हजार 800 रुपये इतकी प्रति हेक्टरी मदत बोंडअळीग्रस्त कोरडवाहू कापूस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येईल.
बागायत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एनडीआरएफमार्फत 13 हजार 500 रुपये, पीक विमा 8 हजार रुपये आणि कापूस नियंत्रण कायद्यांतर्गत कंपन्यांकडून मिळणारी 16 हजार रुपयांची मदत दिली जाईल. अशी एकूण साधारण 37 हजार 500 रुपये इतकी प्रति हेक्टरी मदत बोंडअळीग्रस्त बागायती कापूस उत्पादक शेतकऱ्यास मिळणार आहे. कापसाची मदत ही 2 हेक्टरपर्यंत देण्यात येईल.
फळ आणि भाजीपाला पीक
ओखी वादळाने नुकसान झालेल्या फळ पिकांच्या नुकसानीबाबतही कृषीमंत्री फुंडकर यांनी मदत जाहीर केली. फळ पीकांसाठी एनडीआरएफमार्फत 18 हजार रुपये तर विमा हवामान घटकाच्या जोखमीनुसार पीक विम्याअंतर्गत 9 हजार ते 25 हजार रुपये इतकी मदत दिली जाईल. अशी एकूण साधारण 43 हजार रुपयांपर्यंतची मदत ओखी वादळाने नुकसान झालेल्या फळ पीकांसाठी दिली जाणार आहे. ओखी वादळामुळे नुकसान झालेल्या भाजीपाल्याला एनडीआरएफमार्फत 13 हजार 500 रुपये मदत दिली जाईल.