गोंदिया : प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्या गृहजिल्ह्यात म्हणजेच गोंदियात राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे. युवक राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षांसह 300 कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीतील (NCP Crisis) फुटीनंतर हे सर्व कार्यकर्ते प्रफुल्ल पटेल यांच्यासोबतच होते. मात्र सध्या भाजपच्या कार्यकर्त्यांकडून त्रास होत असल्याचा आरोप करत या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा हात पकडलाय. 


2 जुलै 2023 ला महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा राजकीय भूकंप झाला.  अजित पवार हे सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले. मात्र गोंदिया जिल्हा हा प्रफुल्ल पटेल यांचा गृह जिल्हा असल्याने राष्ट्रवादीत कुठेही फूट पडल्याचे पाहायला मिळाले नाही. मात्र या फुटीनंतर वरिष्ठ स्तरावर शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांना एकत्रित येऊन काम करावे लागले. मात्र राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना सोबत काम करत असताना सामान्य कार्यकर्त्यांची धुसफुस सुरू होती. भाजप कार्यकर्त्याकडून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना त्रास होत असे. तसेच ज्या पद्धतीने भाजपने खासगीकरण करण्याच्या सपाटा सुरू केल्यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला. 


काँग्रेसला बळ राष्ट्रवादीला मोठा धक्का  


गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या सालेकसा तालुक्यातील युवक राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्ष रोहीत बनोटेसह जवळपास 300 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी  देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याने राष्ट्रवादीला गोंदियात मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीसह महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल हटवार यांनी देखील आपल्या 100 कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तर भाजपच्या देखील 50 कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश झाला आहे. काँग्रेसचे देवरी-आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत जवळपास 450 कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तर या पक्षप्रवेशानंतर देवरी आमगाव विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला बळ मिळाला असून राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. 


 काँग्रेस आमदार सहसराम कोरोटे यांचा राज्य सरकारवर निशाणा 


 गोंदिया जिल्ह्यातील आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे आमदार सहसराम कोरोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत जवळपास 450 च्या वर कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर राज्य सरकारवर नाराजी व्यक्त करत 2024 मध्ये महाविकास आघाडीची सरकार येणार आणि सध्या जी कंत्राटी सरकार आहे तिच्या सफाया होणार असेही वक्तव्य आमदार कोरोटे यांनी केले. 


हे ही वाचा :


Supriya Sule : माझ्यामुळे पक्षाला अपयश मिळालं असेल तर स्वीकारते, यालाच लीडरशीप म्हणतात; सुप्रिया सुळेंचा प्रफुल्ल पटेलांवर वार