Maharashtra Weather : वातावरणात सातत्यानं बदल (climate change) होत आहे. महाराष्ट्रात कुठे थंडीचा कडाका (Cold Weather) जाणवत आहे तर कुठे ढगाळ वातावरण आहे. तर काही ठिकाणी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मंदोस चक्रीवादळाचा देखील राज्यात परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान विदर्भात तापमानाचा (Temperatures) पारा चांगलाच घसरला आहे. गोंदिया जिल्ह्यात तापमानाचा पारा 8.8 अंशावर गेल्यानं हुडहुडी वाढली आहे. गोंदिया विदर्भातील सर्वात थंडगार जिल्हा ठरला आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील परभणी (parbhani) आणि उत्तर महाराष्ट्रातील धुळे (Dule) जिल्ह्यातही थंडी वाढली आहे.


गोंदिया जिल्ह्याचा पारा वर जात असतानाच अचानक दोन दिवसापासून त्यात घसरण होत आहे. गोंदिया जिल्ह्यात सध्याचं तापमान 8.8 अंशावर आहे. एक दिवसाआधी गोंदिया जिल्ह्यात तापमान 10.2 अंशावर होते. तर, आज पुन्हा तापमानात घसरण झाली आहे. गोंदिया जिल्हा विदर्भात सर्वात थंडगार ठरला आहे. जिल्ह्यात थंडीचा जोर अधिकचा वाढल्यानं जिल्ह्यतील अनेकजन शेकोटीचा सहारा घेत आहेत. तसेच उबदार कपड्याचाही वापर करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.


उत्तर भारतातही थंडीचा कडाका वाढला


उत्तर प्रदेशसह संपूर्ण उत्तर भारतात थंडीचा प्रभाव दिसायला लागला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून डोंगरांवर होत असलेल्या बर्फवृष्टीमुळं मैदानी भागात थंडी वाढत आहे. बर्फवृष्टीमुळे उत्तर प्रदेशसह संपूर्ण उत्तर भारतीय राज्यांमध्ये तापमानात घसरण सुरू आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी थंडीच्या लाटेचा प्रभाव दिसू लागला आहे. पश्चिम उत्तर प्रदेशात येत्या दोन दिवसांत थंड वाऱ्यांमुळं थंडी आणखी वाढू शकते, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर पूर्वांचलमध्येही गेल्या दोन दिवसांत तापमानात घट झाली आहे.


शेकोट्या पेटल्या


तापामानाचा पारा चांगलाच घसरल्यामुळं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. मागच्या आठवडाभरापासून गायब झालेली थंडी  पुन्हा एकदा वाढू लागली आहे. परभणी जिल्ह्यातही थंडीचा जोर वाढला आहे. शनिवारी परभणी जिल्ह्यात तापमानाचा पारा 6.3 अंशावर गेला होता. त्यामुळं हुडहुडी वाढली होती. तर दुसरीकडं धुळे जिल्ह्यातही तापमानाचा पारा घसरला आहे.


मंदोस चक्रीवादळाचा परिणाम, राज्यात ढगाळ वातावरण


मंदोस चक्रीवादळामुळं तामिळनाडू (Tamilnadu) आणि पुद्दुचेरीमध्ये (Puducherry) मध्यम ते जोरदार पावसाचा (Rain) अंदाज हवामान विभागानं (IMD) वर्तवला आहे. हवामान विभागानं तामिळनाडू राज्यातील अनेक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या चक्रीवादळाच्या स्थितीमुळं महाराष्ट्रातही काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. त्यामुळं काही ठिकाणी थंडीचा जोर कमी झाला आहे.  12 ते 14 डिसेंबर यादरम्यान राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणासह मुंबई, पुणे, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Weather : थंडी वाढली, शेकोटी पेटली; परभणीसह धुळे जिल्ह्यात पारा घसरला