Maharashtra Gondia News: उगवत्या सूर्याची पहिली किरणं भारतात सर्वप्रथम अरुणाचल प्रदेशात पडतात. तशीच महाराष्ट्रात पहिली किरणं गोंदिया (Gondia News) जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील 'चांदसूरज' गावावर पडतात, असं 'चांदसूरज' (Chandsuraj) गावातील नागरिकांचं म्हणणं आहे. 


महाराष्ट्राच्या (Maharashtra News) पूर्वेकडील छत्तीसगड राज्याच्या सीमेलगत डोंगराच्या मधोमध चांदसूरज हे टुमदार गाव वसलेलं आहे. राज्याच्या पूर्व टोकावर जिल्हा मुख्यालयापासून 70 किमीवर असलेल्या या गावापासून छत्तीसगडची (Chhattisgarh) सीमा प्रारंभ होते. डोंगररांगा आणि वनराईनं नटलेल्या अतिदुर्गम सालेकसा तालुक्यातील चांदसूरज गाव म्हणजे, निसर्गरम्य परिसर. जवळच छत्तीसगडमधील डोंगरगड देवस्थान आहे. दोन्ही राज्यांची सीमा ओळखण्याकरता तिथे एक पुरातन शिला उभी केलेली आहे. या शिलेवर चंद्र-सूर्याची आकृती कोरलेली आहे. यावरुनच या गावाला 'चांदसूरज' नाव पडलं असल्याचं मानलं जातं. या शिलेजवळच शीतलामाता देवस्थान असून या मंदिरात देखील चंद्र आणि सूर्याचं प्रतीक दर्शवणाऱ्या लोखंडी आकृतीची नागरिक पूजा करतात. तर सकाळचा सूर्य येथील नागरिकांसाठी देव असल्याचंही नागरिक भावूक होऊन सांगतात.    




विकासाची सूर्यकिरणं चांदसूरजपासून कोसो दूर 


उगवत्या सूर्याची पहिली किरणं 'चांदसूरज' गावावर पडत असली तरी अद्याप या गावात पाहिजे तेवढी विकासाची किरणं पोहोचलेली नाहीत. तसं हे गाव गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात आहे. येथे अनेक सोयीसुविधांचा अभाव आहे. या गावातील मुलांना शिक्षणासाठी पायपीट करावी लागते. चौथीनंतर मुलांना शिक्षणासाठी लगतच्या विचारपूर येथं जावं लागतं, तर सातवीनंतर बदटोला आणि उच्च शिक्षणाकरता आमगाव, दर्रेकसा, सालेकसा येथे जाण्याशिवाय पर्यायच उरत नाही. टोयागोंदी ग्रामपंचायतीअंतर्गत चांदसूरज हे गाव येतं. या गट ग्रामपंचायतीमध्ये विचारपूर, चांदसूरज, चौकीटोला, कोपालगड, टबरूटोला, बरटोला, दलाटोला या गावांचा समावेश आहे. 


जवळपास 700 लोकवस्तीच्या या गावात दररोज सूर्यकिरणं येथील शिलेपासूनच महाराष्ट्रात प्रवेश करतात. त्यानंतरच महाराष्ट्र प्रकाशमय होतो, असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे. गावात 92 घरं असून सुमारे 700 लोकवस्ती आहे. गावात धुरगोंडी आणि राजगोंडी भाषिक लोक राहतात. गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. परंतु, मराठी भाषिक नगण्य असल्यामुळे जिल्हा परिषदेनं हिंदी पाठशाला सुरू केलेली आहे. शाळेत 20 विद्यार्थी आहेत.


'चांदसूरज' नाव नेमकं पडलं कसं? 


तीन ते चार पिढ्या अगोदर चांदसूरज शिलेजवळ काही कारागीर लोक लोखंडी अवजारं बनवत असत. त्या काळात येथे टोकावर उभ्या एका शिलेवर चंद्र आणि सूर्याची प्रतिमा कोरलेली होती. सूर्याची प्रथम किरणं या शिलेवर पडत असल्यामुळे कदाचित गावाचं नावसुद्धा 'चांदसूरज' ठेवलं गेलं असावं, असं गावकरी सांगतात.