Gondia Crime News : एका गाडीचा अपघात झाला आणि पोलीस अपघातग्रस्तांच्या (Gondia Accident) मदतीला गेले, पण तेथील परिस्थिती पाहून पोलीसही चक्रावले. अपघातग्रस्त गाडीतून चक्क दारु तस्करी (Liquor Seize) होत असल्याची बाब उघडकीस आली आहे. महत्त्वाचं म्हणजे अपघातामुळे या गाडीतून दारुची अवैध वाहतूक होत असल्याची बाब उघडकीस आली. अन्यथा हा प्रकार उघडकीसही आला असता का, हा प्रश्न आहे.


अपघातग्रस्तांना मदत करायला गेलेले पोलीसही चक्रावले


मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट येथून छत्तीसगडकडे जात असताना गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील अंजोरा येथे चारचाकी चालकाचा नियंत्रण सुटला आणि गाडी शेत-शिवारात शिरल्याने गाडीचा अपघात झाला. अपघाताची माहिती रस्त्यावरून जात असलेल्या नागरिकांना होतात त्यांनी अपघातग्रस्तांना मदत करण्याकरिता पोलिसांना बोलवलं.


अपघातातील जखमींवर उपचार सुरु


या अपघातामध्ये जखमी झालेल्यांना आमगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर तेथे उपचार सुरू आहे. याप्रकरणी आमगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मात्र, त्या अपघातग्रस्त कारमधील जखमींना मदत करायला पोहोचलेले पोलीस देखील घटनास्थळावरील प्रसंग पाहून चक्रावले. 


अपघातग्रस्त कारमध्ये 400 बॉटल दारू


या गाडीमध्ये चक्क गोवा व्हिस्की कंपनीची 400 बॉटल दारू आढळली. या दारूची किंमत एकूण 40 हजार रुपये एवढी होती. अपघातानंतर गाडीतून दारूची दुर्गंध येत असल्यामुळे गाडीची तपासणी केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे अपघात घडल्यानंतर त्या गाडीत दारू आहे, ही बाब उघडकीस आली आहे. मध्यप्रदेश राज्यातून ही दारू निघाल्यानंतर या गाडीची तपासणी झाली नाही का? अशाच प्रकारे दररोज दारूची वाहतूक होत असेल का? जर होत असेल तर पोलीस प्रशासन याकडे लक्ष देत नाही का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. 


विनापरवाना खत विक्री करणाऱ्या 2 व्यक्तीवर गुन्हा दाखल


गोंदिया जिल्ह्यातील मुंडीपार आणि हेटी येथे विना परवाना खत विक्री करीत असलेल्या दोन इसमानवर कृषी विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली आहे. गोपनीय माहिती कृषि विभागाच्या भरारी पथकाला मिळाली. त्या माहितीच्या आधारावर कृषि विभागाच्या भरारी पथकाने टेकराम कटरे रा. मुंडीपार येथे 80 बॅग भु-वर्धन ऑरग्यानिक खत, तर मंगरु मेश्राम रा. हेटी येथून 70 बॅग भु-वर्धन ऑरग्यानिक खत जप्त केला आहे . एकुण 1,93,500 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.