सोलापूर : मंगळवेढ्यातील ज्वारीला जीआय मानांकन मिळाल्याने दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार, हे निश्चित. स्वादिष्ट नैसर्गिक ज्वारी आता सात समुद्रापार देखील ग्राहकांना मिळू शकणार आहे.
पूर्वी सोलापूरची ओळख ‘ज्वारीचे कोठार’ अशी होती. कालांतराने बाजारपेठ आणि सातत्याने बदलत गेलेल्या पीक पद्धतीमुळे मागे पडलेली ही ओळख आता पुन्हा ज्वारीला जीआय मानांकन मिळाल्याने जगासमोर येणार असून कायम दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या या परिसरातील बळीराजाला देखील आता चांगले दिवस येऊ शकतात.
जीआय अर्थात भौगोलिक निर्देशन मानांकन, यंदा राज्यातील 7 पिकांना मिळाल्याने या शेतामालांना प्रतिष्ठा मिळून ही पिके साता समुद्रापार बाजारपेठेत देखील आता जावू शकणार आहेत.
मंगळवेढा हा कायमच्या दुष्काळी पट्ट्यातील भाग, अनेक भागात असलेली काळी सुपीक जमीन हे खरे मंगलावेढ्याचे वैभव. मात्र वरुणराजाची नेहमीच अवकृपा असली तरी केवळ एका पावसावर येथील बहाद्दर शेतकरी शेकडो पोती ज्वारीच्या पांढऱ्या शुभ्र दाण्यांचे पीक घेतो. कोणतेही रासायनिक खते आणि फवारण्याशिवाय मंगळवेढा येथे पिकलेली सेंद्रिय ज्वारी नुसती चवदारच नाही तर औषधी देखील आहे.
मंगळवेढा येथील 1 लाख 14 हजार हेक्टर क्षेत्रापैकी सध्या 45 हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीचे पीक घेतले जाते. हलक्या जमिनीत एकरी 8 ते 10 क्विंटल, मध्यम जमिनीत 15 ते 20 आणि चांगल्या जमिनीत 25 ते 30 क्विंटल ज्वारीचे उत्पादन होते.
साधारण 15 सप्टेबर ते 15 ऑक्टोबर या काळात पेरणीचा काळ असतो. शहरी भागाचा ज्वारीशी सबंध केवळ मारवाड्याकडे दुकानात मिळणारा तयार हुरडा किंवा मोठ्या हॉटेलमधून मिळणाऱ्या भाकरी एवढ्या पुरताच उरला आहे. त्यामुळे अत्यंत चांगल्या प्रतीच्या सेंद्रिय ज्वारीचा बाजार भाव फक्त 2200 ते 2300 रुपया पर्यंतच राहिला नसता. मात्र आता मंगळवेढा येथील ज्वारीला भौगोलिक निर्देशनाचे मानांकन मिळाल्याने ज्वारीची नेमकी ओळख, गुणवत्तेची खात्री आणि प्रतिष्ठा मिळणार असल्याने आता आम्हाला चांगले दिवस येणार या आनंदात इथले शेतकरी आहेत.
ज्वारीला आयुर्वेदात देखील खूप महत्व असल्याने मधुमेह असलेल्या रुग्णांना याचा खूप मोठा फायदा होऊ शकणार आहे. या मानंकानामुळे मंगळवेढा येथील पांढरी शुभ्र सेंद्रिय ज्वारी देशभरातील बाजारपेठात पोचणे शक्य होणार असून याला चांगले पॅकिंग आणि ब्रँडिंग करून यातून खूप मोठी उलाढाल होऊ शकणार आहे.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे ज्वारीला भाव मिळत नसल्याने दुसऱ्या खर्चिक पिकांकडे वळून कर्जबाजारी बनू लागलेल्या या भागातील शेतकऱ्यांना पुन्हा आपल्या मूळ पिकाकडे परतण्याची संधी आली असून यातूनच पुन्हा ज्वारीची मोठी बाजारपेठ म्हणून सोलापूर जिल्हाची ओळख तयार होणार आहे.