दंतेवाडा (छत्तीसगड) : छत्तीसगडच्या दंतेवाड्यात झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात सीआरपीएफचे सात जवान शहीद झाले. मात्र, या हल्ल्याबात एक नवी माहिती समोर आली आहे. आजारी असलेल्या प्रशिक्षित कुत्र्याला हॉस्पिटलमध्ये भरतीसाठी नेताना रस्त्यात भूसुरुंग स्फोट झाला आणि त्यात सात सीआरपीएफ जवान शहीद झाले.


 

नक्षलवाद्यांनी बुधवारी रस्त्याच्या मधोमध भूसुरुंग स्फोट घडवला आणि या स्फोटात सीआरपीएफचे सात जवान शहीद झाले. हे सातही जवान आजारी असलेला आपल्या कुत्र्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होते.

 

स्काऊट नावाचा हा प्रशिक्षित स्निफर डॉग होता. बेल्जियन मॅलिनॉईस जातीचा कुत्रा असून जंगलात राहिल्याने त्याला डिहायड्रेशन झालं होतं. त्यामुळे आजारी पडला होता. त्याच्यावर उपचार व्हावेत, म्हणून प्राण्यांच्या हॉस्पिटलमध्ये त्याला नेण्यात येत होतं.

 

नक्षलवादी हल्ला होण्याची भीती ओळखून तशी पूर्वतयारीही जवानांनी केली होती. सर्व जवान साध्या वेशात आणि सीआरपीएफच्या गाडीऐवजी टेम्पोमधून प्रवास करत होते. मात्र, तरीही नक्षलवाद्यांच्या हल्ल्यातू नते वाचू शकले नाहीत. नक्षलवाद्यांनी रस्त्यावर 40 ते 50 किलो स्फोटकांचा वापर करुन गाडीला उडवून दिलं.

 

हे सातही जवान साथी असलेल्या प्रशिक्षित कुत्र्याला वाचवताना शहीद झाले. विशेष म्हणजे ज्या कुत्र्याला वाचवताना सात जवान शहीद झाले, त्या कुत्र्याने गेल्या वर्षभरात नक्षलवाद्यांनी लपवलेले भूसुरुंग शोधून काढले होते.