Gadchiroli News : गडचिरोली : आतापर्यंत महाराष्ट्रातील (Maharashtra News) शेवटचा जिल्हा म्हणून गडचिरोली (Gadchiroli) ओळखलं जातं. पण आता गडचिरोली शेवटचा नाहीतर पहिला जिल्हा असेल, असं बोललं जात आहे. यामागचं कारणंही तसंच आहे. आज गडचिरोली जिल्ह्यातील वडलापेठ गावात सूरजागड इस्पात या लोह पोलाद कारखान्याचा भूमिपूजन पार पडणार आहे. राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) या भूमिपूजन सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत. या लोहपोलाद कारखान्यासाठी अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे, राज्याचे मंत्री आणि स्थानिक आमदार धर्मराव बाबा आत्राम (Minister Dharmarao Baba Atram) यांनी या कारखान्यासाठी तब्बल अडीचशे एकर जागा स्वतः दिल्याचा दावा केला आहे. 


गडचिरोली जिल्ह्यातील वडलापेठ येथे होणाऱ्या 'सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड' या लोह पोलाद कारखान्यासाठी राज्याचे मंत्री आणि स्थानिक आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी तब्बल अडीचशे एकर जागा स्वतः दिल्याचा दावा केला आहे. अडीचशे एकर जमीन कारखान्यासाठी देऊ केली असून त्या ऐवजमध्ये कुठलाही मोबदला घेतला नसल्याचं मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी सांगितलं आहे. त्यासोबतच या जमिनीच्या मोबदल्यात भविष्यातही कोणताच मोबदला घेणार नसल्याचंही मंत्री अत्राम यांनी सांगितलं आहे. 


कारखान्यासाठी अडीचशे एकर जमीन दान : मंत्री धर्मराव बाबा आत्राम


राज्याचे मंत्री आणि स्थानिक आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी यासंदर्भात एबीपी माझाशी बातचित केली. त्यावेळी बोलताना स्वतःच्या मतदारसंघातील प्रकल्पासाठी अडीचशे एकर जागा दान म्हणून दिली आहे. जमिनीचा मोबदला मिळावा असा हेतू नसून या मागास जिल्ह्यात मोठे कारखाने यावे आणि लोकांना रोजगार मिळावे हा हेतू असल्याचं आत्राम म्हणाले आहेत. 


आज गडचिरोली जिल्ह्यातील वडलापेठ गावात सूरजागड इस्पात या लोह पोलाद कारखान्याचा भूमिपूजन पार पडणार आहे. राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा पवार यांच्यासह उद्योग मंत्री उदय सामंत या भूमिपूजन सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथील लोह खनिजांच्या खाणीतून निघणाऱ्या लोहखनिजावर आधारित हा कारखाना असणार आहे. या कारखान्यात टप्प्याटप्प्यानं तब्बल 5 हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. तसेच, या कारखान्यामुळे तब्बल 7 हजार लोकांना रोजगार मिळणार असल्याचा दावाही अत्राम यांनी एबीपी माझाशी बोलताना केला आहे.