Gadchiroli Mass National Anthem : गडचिरोलीमधील मुलचेरा गावात एक विशेष उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत दररोज पहाटे गावात सामूहिक राष्ट्रगीत गायन (National Anthem) केलं जातं. 15 ऑगस्टपासून मुलचेरा गावात या राष्ट्रभक्तीपर उपक्रमाला सुरुवात झाली आहे. तेव्हापासून दररोज पहाटे सामूहिक राष्ट्रगीत गायनानंतरच येथील बाजारातील दुकान उघडली जातात. गावातील सर्व नागरिकांचा या उपक्रमाला प्रतिसाद लाभला आहे. तालुका मुख्यालयात असलेल्या मुलचेरा पोलीस स्टेशन येथे काही महिन्यापूर्वी रुजू झालेले ठाणेदार अशोक भापकर यांनी या राष्ट्रभक्तीपर उपक्रमाला सुरुवात केली आहे. राष्ट्रगीत सुरू होण्याआधी एखादे देशभक्तीपर गाणं वाजवून त्यानंतर राष्ट्रगीत गायन होतं आणि मगच मुलचेरा गावातील दुकानं उघडली जातात. नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात लोकांच्या मनात राष्ट्रभक्ती जागृत व्हावी, हा यामागचा उद्देश आहे.


सकाळी 8 वाजून 45 मिनिटांवर काटा आल्यावर 'परेड सावधा, एक साथ राष्ट्रगीत सुरू कर' अशी सूचना येते. ही सूचना कानावर पडेल तो गावकरी जागीच स्तब्ध उभं राहून राष्ट्रगीत गायन करतो. राष्ट्रगीत सुरु होण्याआधी देशभक्तीपर गाणी लावली जातात. त्यानंतर राष्ट्रगीत गायन होतं. यावेळी आजूबाजूच्या छोट्या-मोठ्या वाहन आणि लोकं जागीच थांबतात. राष्ट्रगीत संपताच की सगळे एकत्र 'भारत माता की जय' असा जयघोष करतात आणि त्यानंतर आपआपल्या दिवसाची सुरुवात करतात. दुकानदार आपली दुकान उघडतात आणि बाजारपेठा सुरू होतात आणि गावातील प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त होतात. 


15 ऑगस्टपासून मुलचेरा गावात सामूहिक राष्ट्रगीत गायनाचा हा उपक्रम सुरु आहे. ठाणेदार अशोक भापकर यांनी हा राष्ट्रभक्तीपर उपक्रम सुरु करण्याआधी गावकरी, व्यापारी वर्ग, तरुण पिढी यांच्यासोबत चर्चा केली होती. सर्वानुमते या उपक्रमाला परवानगी मिळाल्यानंतर हा उपक्रम सुरु करण्यात आली. मुलचेरा गावाने 15 आगस्ट 2022 पासून हा उपक्रम अखंड चालू ठेवला आहे. हा उपक्रम सुरू झाल्यापासून गावात भांडण तंटे कमी होऊन एकोपा वाढल्याचं गावकरी सांगतात. तसेच गावकऱ्यांच्या मनात राष्ट्रभक्ती वाढली आहे. या आधी सांगली जिल्ह्यातील भिलवडी आणि तेलंगणा राज्यातील नालगोंडा ह्या गावात ह्या प्रकारे राष्ट्रगीत म्हणून दिवसाची सुरुवात करण्याचा उपक्रम राबवला जात आहे. नालगोंडा गाव हा उपक्रम राबवणारं पहिलं गाव आहे. यानंतर दुसरा क्रमांक भिलवडी गावाचा आणि आता हा तिसरा क्रमांक गडचिरोलीकारांना मिळाला असून ह्या उपक्रमामूळे मुलचेरा गावाची लोकप्रियता वाढली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या