Uday Samant on Refinery Project : रिफायनरी प्रकल्पाबाबत (Refinery Project) गैरसमज पसरवले जात आहे. मात्र, रिफायनरी प्रकल्प राज्याबाहेर जाणार नसल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केली. रिफायनरी प्रकल्पामुळं मोठी रोजगार निर्मिती होणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.  उदय सामंत हे आज (15 सप्टेंबर) एबीपी माझाच्या (ABP Majha) 'माझा कट्टा' (Majha Katta) या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी सध्या विरोधक करत असललेले दावे फेटाळून लावले. 


राज्यात मोठे प्रकल्प आणायचे असल्यास राजकारण बाजूला ठेवणं गरजेचं 


रिफायनरी प्रकल्प हा महाराष्ट्रातच होणार आहे. सध्या त्याबाबत काहीजण गैरसमज पसरवत असल्याचे उदय सामंत यावेळी म्हणाले. आमदारही रिफायनरी प्रकल्पासाठी आग्रही आहेत. रिफायनरी प्रकल्पामुळं मोठी रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती यावेळी उदय सामंत यांनी दिली. राज्यात मोठे प्रकल्प आणायचे असल्यास राजकारण बाजूला ठेवणं गरजेचं आहे. सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे सामंतांनी यावेळी सांगितले. राजकारण करण्यापेक्षा सांघिक अभ्यास करावा, असेही सामंत यावेळी म्हणाले. 


नागपूरमध्ये टाटा एअरबसचा प्रकल्प होणार


वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प हा गुजरातला गेला हे मला कालच समजल्याचे उदय सामंत यावेळी म्हणाले. उच्च तंत्र शिक्षण विभाग आणि उद्योग विभाग ऐकमेकांशी संलग्न असणे गरजेचे आहे. यासंबंधी आम्ही धोरण तयार करत असल्याचे सामंत म्हणाले. येत्या काही दिवसात चांगला प्रकल्प महाराष्ट्राला मिळेल, असेही उदय सामंत यावेळी म्हणाले. दरम्यान, ड्रग्ज पार्कचा प्रकल्प महाराष्ट्रात होणार आहे. तसेच नागपूरमध्ये टाटा एअरबसचा प्रकल्प होणार असल्याची माहिती देखील सामंत यांनी यावेळी दिली. वेदांता-फॉक्सकॉनचा  प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला आहे. यावरुन राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. राजकीय दबावापोटी प्रकल्प गुजरातला गेला असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. यासंदर्भात आज उदय सामंत यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. 


उद्योगमंत्री म्हणून जे काही करणं शक्य असेल ते करणार


वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पातून जेवढ्या नोकऱ्या मिळणार होत्या. त्याच्या दुप्पट नोकऱ्या पुढच्या काळात महाराष्ट्रात आणण्याची जबाबदारी मी घेतो असे आश्वासने देखील यावेळी उदय सामंत यांनी दिले. याबाबत नोकरी लागल्याचा सगळा डेटा मी पुढच्या वर्षी तुमच्यासमोर ठेवेन असेही सामंत म्हणाले. उद्योगमंत्री म्हणून मला जे काही करणं शक्य आहे ती मी करणार आहे. राज्यातील उद्योग आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे देखील सामंतांनी यावेळी सांगितलं. 


महत्त्वाच्या बातम्या: