गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गडचिरोलीत सी-60 जवानांचा सत्कार सोहळा आणि माओवाद्यांचा आत्मसमर्पणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. मला या गोष्टीचा आनंद आहे की माझ्या नववर्षाची सुरुवात आणि संपूर्ण दिवस गडचिरोलीत उपस्थित आहे. गडचिरोलीच्या सी-60 च्या अधिकारी आणि जवानांसोबत घालवता आला. अनेक कार्यक्रम पार पाडता आले. अहेरी ते गरदेवाडा बस स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा धावत आहे. त्या बसचं उद्घाटन आपण केलं. पेनगुंडाला नवीन आऊटपोस्ट सुरु केलं. कोनसरीमध्ये विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलं, यामुळं गडचिरोलीला स्टील सिटीचा दर्जा मिळणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सी-60 अधिकाऱ्यांनी आणि जवानांनी सातत्यानं विविध चकमकीत शौर्य दाखवलं. अनेक माओवाद्यांना न्यूट्रलाईज केल्याचं काम करणाऱ्या शूर जवानांचा आणि अधिकाऱ्यांचा सन्मान करण्याचा महत्त्वाचा कार्यक्रम पार पडला. पोलीस कॅलेंडर 2025 चं प्रकाशन केलं आहे. गेल्या वर्षभरात विविध उपक्रम झाले त्याची झलक पाहायला मिळते. आमच्या पोलिसांनी गडचिरोली जिल्ह्यात माओवाद हा जवळजवळ संपुष्टात आणण्याचं काम सुरु केलं आहे, याचा आनंद आहे. उत्तर गडचिरोली माओवादापासून मुक्त झाली आहे. दक्षिण गडचिरोली माओवादापासून मुक्त होईल याबाबत मनात शंका नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आज जे काही विविध उपक्रम पोलिसांच्या माध्यमातून , जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सुरु झाले त्याचा परिणाम असा आहे, गेल्या चार पाच वर्षात आपल्या गडचिरोलीतून एकही युवक किंवा युवती माओवादी संघटनेत सामील झाली नाही. महाराष्ट्रात माओवाद्यांचं रिक्रुटमेंट पूर्णपणे संपुष्टात आलेलं आहे. हे जे कार्य पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन करु शकलं हे अत्यंत मोलाचं आहे. जनतेचा विश्वास माओवाद्यांवर नाही तर प्रशासनावर, राज्यावर, देशावर आणि संविधानावर वाढतो आहे. त्यामुळं कोणीही संविधान विरोधी चळवळीत जायला तयार नाही हे बघायला मिळतंय, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
या सगळ्या काळामध्ये अनेक जहाल अशा माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं, न्यूट्रलाइज करण्यात आलं, अनेकांना अटक करण्यात आली, सगळ्यात महत्त्वाचं जे असेल ज्या प्रकारचे आत्मसमर्पण सुरु झाले आहेत. माओवाद्यांची कंबर तोडण्याचं काम होत आहे. 38 वर्षांपासून माओवादी चळवळीत महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या ताराक्का ज्या भूपतीच्या पत्नी आहेत. जी मंडळी महाराष्ट्रात किंवा गडचिरोलीत नक्षलवाद रुजवण्यात अग्रणी आहेत, ज्यांनी मोठ्या प्रमाणात केडर निर्माण केले, अशी सगळी मंडळी आत्मसमर्पण करत आहेत, मागच्या काळात असं आत्मसमर्पण बघितलं. आज त्यांच्यासोबत एकूण 11 जणांचं आत्मसमर्पण बघितलं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, माओवाद हा कोणताही विचार नाही,कुठलाही आचार नाही, भारताच्या संविधानावर विश्वास नाही अशा प्रकारच्या लोकांनी अराजकता तयार करण्याकरता हे अभियान उभारलं, सुरुवातीच्या काळात काही लोकं भरकटले. आज जे लोकं या माओवादी गतिविधी आहेत त्यांच्या लक्षात येत आहे, न्याय मिळायचा असेल तर भारतीय व्यवस्थेतून मिळेल, भारतीय संविधानानं तयार केलेल्या संस्थातून मिळेल. विकास पुढं चाललाय तशी माओवादाची पिछेहाट होताना पाहायला मिळेल. सी-60 आणि केंद्रीय सुरक्षा दलांच्या शौर्यामुळं येत्या काळात माओवाद महाराष्ट्रातून हद्दपार झालेला असेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस म्हणाले.
केंद्राच्या माध्यमातून आपल्याला मदत मिळते. पूल,रस्ते,मोबाईल टॉवर अनुदानाच्या माध्यमातून मिळते. अमित शाह यांनी जे को ओरडीनेशन केलं आहे. राज्यांची सीमा बंधनकारक राहिली नाही. महाराष्ट्रानं जसा माओवादावर डॉमिनन्स मिळवला तसा इतर राज्यांनी मिळवावा लागेल. महाराष्ट्राचं मॉडेल इतर राज्य स्वीकारत आहेत.गडचिरोलीच्या पोलीस दलाने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. हे सगळ्या पोलीस दलाचे यश आहे. काही मदत लागेल ती राज्य सरकार करत राहील, तुमच्यासोबत राज्याचा गृह विभाग उभा राहील. 2025 चा हा सूर्य उगवला आहे तो असाच राहिला पाहिजे. विकासाच्या दिशेनं, शांततेच्या दिशेनं, सामाजिक सलोख्याच्या दिशेनं गडचिरोलीची वाटचाल सुरु राहील. ताराक्कांसह ज्यांनी आत्मसमर्पण केलं आहे त्यांचे योग्य काळजी घेतली जाईल. इतर जे भटकले आहेत त्यांना संदेश द्या खरा मार्ग भारतीय संविधानाचा आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांची नावं :
विमला चंद्रा सेडाम उर्फ ताराक्का
सुरेश बैसाखी उईके उर्फ चैतू उर्फ बुटी
कल्पना गणपती तोरेम उर्फ भारती उर्फ तोरेम
अर्जुन तानू हिचामी उर्फ सागर उर्फ सुरेश
संम्मी पांडू मट्टामी उर्फ बंडामी
निशा बोडका हेडो उर्फ शांती
श्रृती उलगे हेडो उर्फ मन्ना
शशिकला पथ्थीराम उर्फ श्रृती
सोनी सुक्कू मट्टामी
आकाश सोमा पुंग्गाटी उर्फ वत्ते
इतर बातम्या :