गडचिरोली : देशाला स्वतंत्र होऊन 78 वर्षे झाली तरीही काही जिल्ह्यात आरोग्य, शिक्षण आणि मुलभूत सुविधांसाठीच नागरिकांची संघर्ष पाहायला मिळत आहे. सरकारकडून अद्यापही येथील नागरिकांना रस्ते, वीज, पाणी, यांसह आरोग्य व शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे दिसून येते. कधी कधी गरोदर महिलेला झोळी करुन रुग्णालयात न्यावे लागत असल्याचेही अनेकदा समोर आलं आहे. मात्र, आता याच आदिवासी पाड्यातील, भामगरागड (Gadchiroli) येथील तीन विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेत देदीप्यमान यश मिळवत डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगलं आहे. नुकताच NEET (नीट) परीक्षेचा निकाल जाहीर झाला, त्यात येथील तीन विद्यार्थ्यानी परीक्षा उत्तीर्ण केली असून आता ते डॉक्टर (Doctor) होणार आहेत.
शहरात राहून उच्च शिक्षण घेणं आणि करिअर घडवणं अनेकांसाठी सोपं असतं, कारण तिथे सर्व सोयी-सुविधा उपलब्ध असतात. पण महाराष्ट्रातील सर्वात मागासलेल्या आदिम जमातींपैकी एक असलेल्या, दुर्गम गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम गावातून डॉक्टर बनण्याचं स्वप्न पूर्ण करणं, ही खरोखरच कौतुकास्पद कामगिरी आहे. कारमपल्लीचा देवदास, मल्लमपोडूरची सानिया आणि दुब्बागुड्याचा गुरुदास यांनी हे स्वप्न प्रत्यक्षात आणलं आहे. 14 जून रोजी जाहीर झालेल्या नीट NEET परीक्षेच्या निकालात भामरागड तालुक्यातील या तीन विद्यार्थ्यांनी आपली चमक दाखवली. देवदास मंगू वाचामी (472 गुण), सानिया तुकाराम धुर्वे (364 गुण), आणि गुरुदास गिसू मिच्चा (348 गुण) अशी त्यांची नेत्रदीपक कामगिरी आहे.
सानिया आणि गुरुदास यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण आदिवासी विकास विभागाच्या नामांकित शाळा उपक्रमांतर्गत ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल, आलापल्ली आणि ज्ञानदीप हायस्कूल, सिरोंचा येथे झालं होतं. या तिन्ही विद्यार्थ्यांनी धाराशिवच्या 'उलगुलान' येथून नीट परीक्षेचे मार्गदर्शन मिळवले. या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागडमार्फत त्यांच्या घरी जाऊन करण्यात आला. प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी नमन गोयल यांनी सानियाशी संवाद साधताना तिला भविष्यात कुठे सेवा देणार याबद्दल विचारलं. त्यावर सानियाने, शहरात अनेक डॉक्टर उपलब्ध असले तरी, तिच्या गावात कुणीही डॉक्टर यायला तयार नसतात, त्यामुळे तिला आपल्या दुर्गम गावातच सेवा द्यायची आहे, अशी इच्छा व्यक्त केली. विशेष म्हणजे, देवदास आणि गुरुदास यांचे वडील अल्पभूधारक शेतकरी आहेत तर सानियाचे वडील मल्लमपोडूर येथील शेतीत उत्पन्न नसल्यामुळे सूरजागड लोहखनिज प्रकल्पात ट्रक चालक म्हणून काम करतात. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही या मुलांनी मिळवलेलं हे यश प्रत्येकासाठी एक मोठा धडा आहे.
हेही वाचा
अहमदाबाद विमानाचा व्हिडिओ शुट करणारा आर्यन पोलिसांच्या ताब्यात; घराबाहेर माध्यम प्रतिनिधींच्या रांगा