Harshvardhan Jadhav नागपूर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. सरकारी कामात अडथळा आणण्याच्या प्रकरणात हर्षवर्धन जाधव यांना एक वर्ष कारावासाची शिक्षा आणि वीस हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने (Nagpur District and Sessions Court) हि शिक्षा सुनावली आहे.
सरकारी कामात अडथळा आणण्याच्या प्रकरणात शिक्षा
दरम्यान, तत्कालीन शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे कन्नड (जि. छत्रपती संभाजीनगर) विधानसभेचे माजी आमदार असून भाजप नेते रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. 6 डिसेंबर 2014 रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नागपूरच्या हॉटेल प्राइडमध्ये पक्षाच्या नेत्यांसोबत बैठक सुरू होती. त्या बैठकीच्या वेळेला आत जाऊन उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्न करणाऱ्या हर्षवर्धन जाधव यांना हॉटेल प्राइडमध्ये सुरक्षा बंदोबस्तात नेमलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी थांबवले होते. त्या वेळेस हर्षवर्धन जाधव यांनी पोलीस निरीक्षक पराग जाधव यांच्याशी वाद घालत त्यांना धक्काबुक्की केली. तसेच त्यांच्या कानशिलात लगावल्याचे आरोप होते.
नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने ठरवलं दोषी
दरम्यान, त्या प्रकरणी नागपूरच्या सोनेगाव पोलीस स्टेशनमध्ये हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. शासकीय कामात अडथळा आणणे आणि मारहाण करणे या आरोपाखाली नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी मानत त्यांना एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
2011 मध्येही पोलीस कर्मचाऱ्याला मारहाणीचा खटला
हर्षवर्धन जाधव यांना यापूर्वी देखील पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणात जिल्हा न्यायालयाने एका वर्षाची सक्तमजुरी व 10 हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली होती. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे पाच जानेवारी 2011 रोजी वेरुळ लेणीला भेट देण्यासाठी आणि वेरुळच्या पर्यटन केंद्रामध्ये असलेल्या शासकीय बैठकीसाठी औरंगाबादला आले होते. त्यावेळी, त्यांना भेटण्याच्या आग्रहावरुन पोलिस व आ. जाधव यांच्यात झटापट झाली. जाधव यांनी पोलिसांना मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली होती. पोलिस निरिक्षक धनंजय येरुळे यांनी तपास पूर्ण करून दहा मार्च 2011 रोजी न्यायालात दोषारोपपत्र दाखल केले होते. सुनावणीअंती न्यायालयाने आमदार जाधव यांना दोषी धरले. सरकारी कामात अडथळा आणणे व शासकीय कर्मचाऱ्यांना जखमी केल्याच्या कलमांतर्गत जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली व 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यावेळी, औरंगाबाद खंडपीठाने जाधव यांना 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन देखील मंजूर केला होता.
इतर महत्वाच्या बातम्या