Mumbai News: मुंबईच्या नागपाडा परिसरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात पाण्याची टाकी साफ करताना गुदमरून (Suffocation) चार सफाई कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर यातील एक मंजूर गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. यात इमारतीत पाण्याची टाकी साफ करत असताना त्याच टाकीमध्ये अचानक गुदमरून मृत्यू झाल्याचे सांगितलं जातंय. तर ही इमारत बांधकामाधीन असल्याचे ही सांगण्यात आलंय. घटनेची माहिती मिळताच पोलीस, बीएमसीचे वॉर्डचे कर्मचारी आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली आहे.


घटना घडल्यानंतर लागलीच या कामगारांना जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र संबंधित डॉक्टरांकडून गुदमरलेल्या  4  जणांना मृत घोषित करण्यात आलं आहे. तर एक कामगार गंभीर असल्याचे सांगितले जातंय. मात्र अचानक घडलेल्या या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. 


नेमकं प्रकरण काय?


मुंबईच्या नागपाडा परिसरात असलेल्या बिस्मिल्ला स्पेस या निर्माणाधीन इमारतीच्या तळघरात असलेल्या पाण्याच्या टाकीत गुदमरून चार कामगारांचा मृत्यू झाला असून एक कामगार गंभीर आहे. हसीबुल शेख, राजा शेख, जलालू शेख, इमानदू शेख अशी मयत कामगारांची नावे आहेत. तर पुरहन शेख हा कामगार गंभीर आहे. पाण्याच्या टाकीत लावण्यात आलेले खांब काढायला आणि ती टाकी साफ करायला एक एक करून हे कामगार उतरले आणि परत बाहेर आलेच नाहीत. म्हणून इतर कामगारांनी याची माहिती अग्निशमन दल आणि पोलिसांना दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी या टाकीत उतरून या पाच जणांना बाहेर काढले आणि जेजे रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. मात्र यातील चार जणांचा दुर्दैवी  मृत्यू झाला.


या प्रकरणी सर जेजे मार्ग पोलिसांनी तपास सुरू केला असून पुढील कारवाई सुरू आहे. तर हे कामगार हातवर पोट असणारे आहेत, त्यांच्या कुटुंबाला मदत मिळावी, अशी मागणी या कामगारांचे मित्र मंडळी करीत आहेत. मात्र या घटनेमध्ये चूक नेमकी कोणाची आहे? या संदर्भात चौकशी करून जे.जे मार्ग पोलीस पुढील कारवाई करणार असल्याची माहिती जे.जे मार्ग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय काटे यांनी दिली आहे.


हे ही वाचा