महापौर संदीप जोशींवरील हल्ल्याची गंभीर दखल, तपास गुन्हे शाखेकडे : मुख्यमंत्री
एबीपी माझा वेब टीम | 18 Dec 2019 04:54 PM (IST)
काल रात्री नागपुरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यात ते सुदैवाने बचावले. या प्रकरणी विधानसभेत विरोधकांनी नागपूरचे महापौरच असुरक्षित असतील तर सर्वसामान्यांचं काय असा सवाल उपस्थित केला होता. यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी या हल्ल्याची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असल्याचे सांगितले आहे.
नागपूर : नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावरील हल्ल्याची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानपरिषदेत केली आहे. विधानपरिषदेत नियम 289 अन्वये विचारलेल्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य अनिल सोले, रामदास आंबटकर यांनी नियम 289 अन्वये हा विषय मांडला होता. तर विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरचे महापौरच असुरक्षित असतील तर सर्वसामान्यांचं काय असा सवाल उपस्थित केला होता. नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार झाला. या हल्ल्यात जोशी आणि त्यांचे कुटुंब थोडक्यात बचावले आहे. रात्री साडेबाराच्या आसपास महापौर संदीप जोशींवर हल्ला झाला. जोशी यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने ते निवडक मित्रांसह आऊटर रिंग रोडवरील रस रंजन धाब्यावर जेवायला गेले होते. परत येत असताना जोशी यांच्या फॉर्च्युनर कारवर बाईकवरुन आलेल्या हल्लेखोरांनी जोशींच्या कारवर 3 गोळ्या झाडल्या. मात्र यात कुणालाही इजा झाली नाही. गेल्या 12 दिवसांपासून महापौर संदीप जोशी यांना धमकीची पत्रं येत होती. त्याचाच संबंध या हल्ल्याशी आहे का? याचा शोध पोलीस घेतायत. या गोळीबाराची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. नागपुरात हिवाळी अधिवेशनानिमित्त एकीकडे मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तर दुसरीकडे नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याने नागपुरात एकच खळबळ उडाली आहे. या जीवघेण्या हल्ल्यात संदीप जोशी थोडक्यात बचावले. जोशी यांच्या लग्नाचा काल वाढदिवस असल्याने कुटुंबीय आणि मित्रांनी तिथे कौटुंबिक कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. कार्यक्रम आटपून सर्व मित्र नातेवाईक नागपूरकडे परतत असताना संदीप जोशी एका मित्रासह त्यांच्या फॉर्च्युनर कारमध्ये सर्वात मागे होते. 12 वाजून 5 मिनिटांच्या सुमारास त्यांची कार आऊटर रिंग रोडवर परसोडी जवळील एम्प्रेस पॅलेसजवळ असताना मागून बाईकवर आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी संदीप जोशी यांच्या चालत्या कारवर 3 गोळ्या झाडल्या. तिन्ही गोळ्या संदीप जोशी यांच्या कारला लागल्या. एक गोळी संदीप जोशी यांच्या बाजूच्या काचेतून कारच्या आत शिरली. तर दुसरी गोळी कारच्या मागील सीटमध्ये शिरली. तिसरी गोळी कारच्या मागील बाजूला लागली.