“एकीकडे यवतमाळमध्ये सरकारी अनास्थेमुळे शेतकरी, शेतमजूर कीटकनाशक फवारणीमुळे जीव गमावतात. तर दुसरीकडे, मुख्यमंत्री, कृषिमंत्री व सत्ताधारी ताकदवान नेते विदर्भातले असूनही यवतमाळ जिल्हा दुर्लक्षित आहे.”, असे म्हणत नांदगावकरांनी सर्वांवरच निशाणा साधला.
“मुख्यमंत्री एसआयटी चौकशी जाहीर करतात. मात्र हा फार्स असून जोवर दोषी अधिकारी पदावरुन हटवले जात नाही, तोवर पारदर्शक चौकशी कशी काय होऊ शकेल?”, असाही सवाल नांदगावकर यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्र्यांनी यवतमाळला येऊन विषबाधितांना भेट द्यायला हवी होती. शिवाय, मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर करण्यातही मुख्यमंत्र्यांनी दुजाभाव केला, असाही आरोप बाळा नांदगावकर यांनी केला.
चिनी बनावटीचे फवारणी पंप वापरल्याने शेतकऱ्यांना विषबाधा?
कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन विदर्भात 34 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागले. तर साडे पाचशेपेक्षा जास्त शेतकरी विषबाधा झाल्यामुळे उपचार घेत आहेत. याप्रकरणाची चौकशी केल्यानंतर यामागे चिनी बनावटीचे फवारणी पंप असल्याचं समोर आलं आहे.
प्रशासनाकडून विषबाधा प्रकरणाचा शोध घेतला जात आहे. देशी बनावटीचे फवारणी पंप किंवा बॅटरीवर चालणारे स्वयंचलित पंप यांसोबत आता चिनी बनावटीचे फवारणी पंपही सध्या बाजारात उपलब्ध आहेत. या पंपच्या सहाय्याने कमी वेळात जास्त एकराची फवारणी करता येते. त्यामुळे या पंपांना जास्त मागणी आहे.
पेट्रोलवर चालणारा हा चिनी पंप मोठ्या प्रमाणात तुषार फेकतो. या पंपातून निघणारे तुषार हलके असल्याने ते हवेत जास्त काळ राहतात. शेतकऱ्यांनी पुरेशी काळजी घेतलेली नसेल तर यातूनच विषबाधा होते, असा निष्कर्ष समोर आला आहे.
फवारणी करताना काय काळजी घ्याल?
फवारणी करताना तोंडाला कापड लावलं तर श्वास घेता येत नाही. बूट घातले तर वजन घेऊन चालत येत नाही, त्यामुळे अशी काळजी घेतली नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उलटी, मळमळ, चक्कर येणे हा त्रास सुरू होतो.
शेतकरी अनेकदा दिवसभर तापत्या उन्हात काम करतात. कीटकनाशकाचे डब्बे सुरक्षित ठिकाणी जमिनीत टाकून नष्ट करावेत, फवारणी करताना वाऱ्याची दिशा पाहावी, कीटकनाशक जमिनीवर आणि गवतावर सांडू देऊ नये, फवारणी केल्यानंतर हात-पाय स्वच्छ धुवावे, कोट, हातमोजे, टोपी, डोळ्यांसाठी गॉगल या साहित्याचा वापर करावा, फवारणी करताना कीटकनाशकाची मात्रा न घेता नेमून दिलेल्या मापानुसार कीटकनाशक फवारावे, असा सल्ला डॉक्टर देत आहेत..
ही सर्व आकडेवारी सराकरी रुग्णालयांमधील आहे. खाजगी रुग्णालयांमध्येही हजारो शेतकरी उपचार घेत आहेत. त्यामुळे कृषी विभागाने जागरूकता मोहीम राबवण्याची गरज निर्माण झाली आहे.