नागपूर : जिल्ह्यात एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान चालु वर्षात राबविण्यात येत असून या शेतकऱ्यांनी याअंतर्गत येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडिबीटी पोर्टलवर त्वरीत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडे यांनी केले आहे. या योजनेअंतर्गत विविध कामांसाठी शासनातर्फे अनुदान देण्यात येणार आहे.
राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत विविध योजना
हरितगृह उभारणी- यासाठी कमीत कमी 500 चौरसमीटर ते जास्तीत जास्त 4 हजार चौरसमीटरपर्यंत अनुदान देय राहील. रक्कम 844 रुपये ते 1 हजार 465 रुपये चौरसमीटर मापदंडानूसार येणाऱ्या खर्चाच्या 50 टक्के अथवा प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के जे कमी असेल ते अनुदान सर्व प्रकारच्या लाभार्थ्यांना देय राहील.
शेडनेट हाऊस उभारणी – यासाठी कमीत कमी 1 हजार ते जास्तीत जास्त 4 हजार चौरसमीटरपर्यंत अनुदान देय राहील. रक्कम 381 रुपये ते 700 रुपये चौरसमीटर मापदंडानुसार येणाऱ्या खर्चाच्या 50 टक्के अथवा प्रत्यक्ष खर्चाच्या जे कमी असेल ते अनुदान सर्व प्रकारच्या लाभार्थ्यांना देय राहील.
सामुहिक तळे- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियानात सामुहिक शेततळे हा घटक 100 टक्के अनुदानावर राबविण्यात येत आहे.
फलोत्पादन यांत्रिकीकरण – ट्रॅक्टर या घटकास अनुसूचित जाती व जमाती, महिला, सिमांत शेतकऱ्यास खरेदी किमतीच्या 35 टक्के जास्तीत जास्त 1 लाख तसेच सर्वसाधारण घटकास खर्चाच्या 25 टक्के जास्तीत जास्त 75 हजार अनुदान देय आहे.
संत्रा पुनरुज्जीवन- संत्रा पुनरुज्जीवन या घटकात कमीत कमी 0.20 हेक्टर व जास्तीत जास्त 2 हेक्टरपर्यंत लाभ देय असून येणाऱ्या खर्चाच्या 50 टक्के व जास्तीत जास्त 20 हजार रुपये अनुदान देय आहे.
हळद क्षेत्र विस्तार- या घटकात कमीत कमी 0.50 हेक्टर ते जास्तीत जास्त 1 हेक्टरपर्यंत लाभ देय आहे. सरासरी लागवड खर्चाच्या 40 टक्के व जास्तीत जास्त 12 हजार रुपये अनुदान देय आहे
प्लॅस्टिक मल्चिंग- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत प्लॅस्टिक मल्चिंग या घटकात जास्तीत जास्त 2 हेक्टरमर्यादेपर्यंत लाभ देण्यात येत असून खर्चाच्या 50 टक्के व जास्तीत जास्त 16 हजार रुपये प्रती हेक्टर अनुदान देय आहे.
वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण- प्लॅस्टिक फिल्म अस्तरीकरण या घटकासाठी अनुज्ञेय खर्चाच्या 50 टक्के अथवा जास्तीत जास्त 75 हजार रुपये अनुदान देय आहे.
फळपिक लागवड- एकात्मिक फलोत्पादन अभियांनातर्गत नावीण्यपूर्ण फळपिक ड्रॅगन फ्रुट व इतर फळपिक लागवडीसाठी प्रकल्प खर्चाच्या 40 टक्के या प्रमाणे अनुदान देय आहे.
या सर्व योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले असून अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.