औरंगाबाद: कारखान्याकडून शेतकर्‍यांचे ऊस बिल माफ करण्यात यावे, यासाठी आंदोलनाचा इशारा देणार्‍या शेतकरी नेते भाई गंगाभिषण थावरे यांना माजलगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना नजर कैदेत ठेवण्यात आलं आहे.

गंगाभिषण थावरे यांनी औरंगाबादच्या उच्च न्यायालय खंडपीठाकडे ऊस बिलासंदर्भात जनहित याचिका दाखल केली होती. एन. एस. एल. शुगर्स लिमिटेड युनिट-3 जय महेश पवारवाडी साखर कारखान्याने गाळप हंगाम 2018-19 ची एफ.आर.पी.रक्कम थकीत ठेवली होती. त्यामुळे या प्रकरणात सदर कारखान्याची मालमत्ता विक्री करुन ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकित एफ.आर.पी.रक्कम माफ करण्याचे निर्देश दिले. परंतु या गोष्टीला दोन महिने उलटूनही शेतकर्‍यांची रक्कम माफ करण्यात आली नाही. त्यामुळे भाई थावरे यांनी दि.26 ऑगस्ट 2019 रोजी औरंगाबादच्या उच्च न्यायालय खंडपीठाच्या दारात तोंडाला काळ्या पट्या बांधून शेतकर्‍यांसह आंदोलन करण्याचा इशारा दिला.

थावरेंना या आंदोलनापासून रोखण्यासाठी माजलगाव शहर पोलिसांनी गजानन नगरमध्ये असलेल्या त्यांच्या घरातून त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना माजलगाव शहर पोलिस ठाण्यात नजर कैदेत ठेवण्यात आलं. सध्या गंगाभिषण थावरे हे पोलीस स्टेशनमध्ये नसले तरी घरी आणि त्यांच्या कार्यालयात पोलिसांनी त्यांना नजर कैदेत मात्र कायम ठेवलं आहे.