नवी दिल्ली : दिल्लीत केजरीवाल यांच्या समोर पर्याय कोण या प्रश्नाचं उत्तर बहुधा भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना मिळालेलं दिसत नाही. त्यामुळेच अखेर केजरीवाल यांच्या विरोधात फारसे न ऐकलेलेच उमेदवार मैदानात उतरवण्यात आले आहेत. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता.

केजरीवाल यांच्यासमोर कोण लढणार ? या प्रश्नाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोरात होती. भाजपकडून कुमार विश्वास लढणार अशी अफवा पसरली होती. तर काँग्रेसकडून निर्भयाची आई आशादेवी लढणार अशीही अफवा पसरली होती. नवी दिल्ली विधानसभेतली ही लढाई रंगतदार होणार अशा पद्धतीनं गरमागरमीत चर्चा तर खूप सुरु झाल्या. शेवटी भाजपचे सुनील यादव आणि काँग्रेसचे रोमेश सभरलवाल यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. यादव आणि सभरलवाल ही नावे परिचयाची नाही.

केजरीवाल यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार सापडत नसल्यामुळेच दोन्ही पक्षांनी अखेर सामान्य उमेदवारांवरच काम भागवल्याचं दिसतं आहे. निकाल माहिती असला तरी अनेकदा फायटिंग स्पिरीट दाखवण्यासाठी अशी लढत होणं आवश्यक असतं. 2013 मध्ये केजरीवाल यांनी तर थेट काँग्रेसच्या तीन वेळच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना पराभूत केलं होतं. पण केजरीवाल यांना मात्र दोन्ही पक्षांनी केकवाँक देऊन त्यांचं काम सोपंच केलं आहे.

Kolhapur Airport | कोल्हापूरहून तिरुपतीला जाणारं विमान रद्द, विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ | ABP Majha



केजरीवाल यांच्यासमोर भाजपनं मुख्यमंत्रिपदाचा चेहराही प्रोजेक्ट केलेला नाही. प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी हे मूळचे बिहारचे आहेत. पण त्यांच्या नावावर स्थानिक नेत्यांमध्येच मतभेद आहेत. त्यामुळेच दिल्लीतल्या रस्त्यारस्त्यावर एकटया मोदींचेच फोटो लागल्याचं दिसतंय.

केजरीवाल यांनी आज अखेर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तो ज्या पद्धतीनं दाखल केला त्याचीही दिल्लीत खूप चर्चा सुरु आहे. खरंतर कालच मोठी रॅली काढत ते अर्ज भरायला निघाले होते. पण या गर्दीत दुपारी तीन वाजेपर्यंत ते कार्यालयात पोहचू शकले नाहीत. त्यामुळे दुस-या दिवशी अर्ज भरला. गर्दी हे कारण असलं तरी केजरीवाल यांच्या या खेळीपाठीमागे एक वेगळं कारण असल्याचीही चर्चा आहे.

मागच्या वेळीही केजरीवाल यांनी असाच प्रकार केला होता. विशेष म्हणजे त्यावेळी तारीखही अगदी सेम होती. म्हणजे 20 जानेवारी 2015 ला ते रोड शोनं अर्ज भरायला निघाले. पण गर्दीमुळे त्या दिवशी अर्ज भरलाच नाही. मग दुस-या दिवशी म्हणजे 21 जानेवारीला त्यांनी अर्ज भरला. पाच वर्षांपूर्वी झालेल्या त्या निवडणुकीत आपला प्रचंड यश मिळालं होतं. 70 पैकी 67 जागा पक्षानं जिंकल्या होत्या. त्याच यशाची पुनरावृत्ती व्हावी म्हणून, जाणूनबुजून त्याच पद्धतीनं केजरीवाल यांनी अर्ज भरल्याचं काहीजण सांगत आहेत. आता त्यांना खरोखर तसं यश मिळणार का? याचं उत्तर 11 फेब्रुवारीच्या निकालांतच कळेल.