Anil Ambani : आशियातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे धाकटे बंधू अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण 17,000 कोटी रुपयांच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी प्रवर्तन संचालनालय (ED) अर्थात ईडीने रिलायन्स समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिल अंबानी यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. त्यात त्यांना 5 ऑगस्ट रोजी ईडी मुख्यालयात (नवी दिल्ली) हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे गेल्या आठवड्यात ईडीने (ED) अनिल अंबानींच्या रिलायन्स समूहाशी संबंधित अनेक संस्था आणि व्यक्तींच्या जागेवर मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (PMLA) छापे टाकले होते. ही कारवाई मुंबईतील 35 ठिकाणी करण्यात आली, ज्यामध्ये 50 कंपन्या आणि 25 व्यक्तींचा समावेश होता. अशातच या नोटीसमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

Continues below advertisement

काय आहे प्रकरण?

1. 3 हजार कोटी रुपयांच्या कर्जाशी निगडीत हे प्रकरण आहे.

Continues below advertisement

2. येस बँकेनं दिलेलं तीन हजार कोटींचं कर्ज अन्य कंपन्यांत वळवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

3. अनिल अंबानींशी निगडीत 35 ठिकाणांवर 24 जुलै ईडीचे छापे टाकण्यात आले होते.

4. 2017 ते 2019 दरम्यान 3 हजार कोटींचं कर्ज अन्यत्र वळवलं, असा आरोप आहे.

5. बँकेच्या प्रमोटर्ससह अन्य अधिकाऱ्यांना अंबानींनी लाच दिल्याचा संशय आहे.

6. येस बँकेकडून अंबानींची पत न बघता जुन्या तारखांवर कर्जवाटपाचा संशय

7. कर्जाच्या बदल्यात अनिल अंबानींनी 2 हजार 850 कोटींचे येस बँकेचे बाँड घेतल्याचा हि आरोप करण्यात आलाय.

8. अनिल अंबानींनी घेतलेले 2, 850 कोटींचे बाँड्स माफ करुन पैसा उचलला

काय आहे तपास यंत्रणेचा दावा?

कर्जाची रक्कम कथितपणे इतर कंपन्यांकडे वळवण्यात आली आणि मनी लाँड्रिंगच्या कक्षेत येणाऱ्या विहित उद्देशाव्यतिरिक्त इतर कारणांसाठी वापरली गेली, असा आरोप आहे. या छाप्यांमध्ये अनेक कागदपत्रे, आर्थिक व्यवहार, डिजिटल रेकॉर्ड आणि इतर पुरावे ताब्यात घेण्यात आले. केंद्रीय तपास यंत्रणेचा आरोप आहे की रिलायन्स ग्रुपच्या अनेक कंपन्यांनी येस बँकेकडून कोणतीही पुरेशी हमी न घेता मोठी कर्जे घेतली आणि शेल कंपन्यांद्वारे पैसे इतर कामांवर खर्च केले गेले. यापूर्वी, या प्रकरणात सीबीआयने दोन एफआयआर दाखल केले होते, त्यानंतर ईडीने तपास सुरू केला.

महत्वाच्या बातम्या: