सुरत येथील 37 वर्षीय भूलतज्ज्ञ डॉ. संकेत मेहता स्वतः कोरोनाने बाधित होऊन अति दक्षता विभागात (आयसीयू) उपचार घेत असताना, अचानकपणे 71वर्षाचे गृहस्थ आयसीयू मध्ये दाखल झाले आणि त्यांच्यावर उपचार करण्याकरता व्हेंटिलेटर ठेवणं गरजेचं होतं त्यासाठी उपचाराचा भाग म्हणून ट्यूब टाकणं गरजेचं होतं. मात्र डॉक्टर येण्यास उशीर होत असल्याचे समजताच डॉ. मेहता यांनी स्वतःचा ऑक्सिजन मास्क काढून बाजूला ठेवत, स्वतःच्या तब्येतीचा विचार न करता या रुग्णामध्ये ट्यूब टाकण्याचे काम केले. त्यानंतर पुन्हा त्यांनी स्वतःच्या बेडवर जाऊन कोरोनाचे उपचार घेतले. त्यांच्या या कामांची सर्वत्र प्रशंसा होत होती. मात्र सध्या ते कोरोना पासून बरे झाले असले तरी, या कोरोनाचा त्यांच्या फुफ्फुसांवर भयंकर परिणाम झाला असून त्यांना 'फुफ्फुसांचे प्रत्यारोपण' करावे लागणार आहे. या करिता त्यांना चेन्नईच्या रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. या उपचारासाठी तब्बल एक कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. त्याची जुळवाजुळव करण्यासाठी सुरत येथील इतर डॉक्टर सहकाऱ्यांनी मदतनिधी (क्राऊडफंडिंग) गोळा करण्यास सुरुवात केली आहे, त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याचे आवाहन या सहकाऱ्यांनी केलं आहे.
डॉ. मेहता यांना पुढच्या उपचारासाठी, एअर अॅम्ब्युलन्सने चेन्नई येथील एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहे. प्रत्यारोपणाच्या निर्णयाअगोदर त्यांचा संसर्ग कमी करण्याचे काम करण्यात येणार आहे आणि योग्यवेळी प्रत्यारोपणाचा निर्णय घेण्यात येणार आहे. दोन दिवसापूर्वीच सुरत अॅनेस्थेसिस्ट असोसिएशन यांनी एक पत्रक काढून डॉ .मेहता यांच्या सध्याच्या उपचाराविषयी आणि भविष्यातील उपचाराविषयी सविस्तर माहिती दिली आहे. त्यामध्येच त्यांनी डॉ . मेहता यांच्या पुढील खर्चाविषयीचा तपशील देऊन त्यांच्या सदस्यांना थेट डॉ. मेहता यांच्या बायकोच्या बँक खात्यात मदत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
डॉ. मेहता यांना रुग्णांवर उपचार करत असताना 28 जुलै रोजी कोरोनाचा संसर्ग झाला होता, त्याकरिता त्यांना सुरत येथील बीएपीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना ऑक्सिजनची कमतरता जाणवल्याने आय सी यू मध्ये आणलं. हाय फ्लो नेजल क्यानुला (नाकाद्वारे वेगात ऑक्सिजन देणारी नळी ) द्वारे ऑक्सिजनही दिला जात होता. मात्र 9 ऑगस्ट रोजी ते उपचार घेत असताना 71 वर्षाचा माणूस अत्यवस्थ अवस्थेत असताना आय सी यू मध्ये आला आणि त्यांच्या उपचाराचा भाग म्हणून त्यांना व्हेंटिलेटर ट्यूब टाकावी लागते आणि ते काम कुशल तज्ञ डॉक्टर करत असतात. मात्र त्यावेळी डॉक्टर येण्यासाठी काही काळ जाणार होता मात्र तो वेळ निघून जाऊ नये आणि तात्काळ वेळेत या रुग्णाला उपचार मिळावे म्हणून बाजूच्याच बेडवर उपचार घेत असणारे डॉक्टर मेहता उठले त्यांनी स्वतःच्या ऑक्सिजनची नळी बाजूला काढली आणि त्या रुग्णाला ट्यूब टाकून व्हेंटिलेटरवर ठेवलं आणि स्वतः परत आपल्या बेडवर जाऊन उपचार घेऊ लागले. या प्रसंगावधानाने केलेल्या तातडीच्या उपचारानंतरही तो रुग्ण चार -पाच दिवस उपचार घेतल्यानंतर दगावला. डॉ. मेहता यांच्या या कामाची दखल सर्व माध्यमांमध्ये घेण्यात आली होती आणि सर्व स्तरातून त्यांचे कौतुक करण्यात आले होते.
काही काळ रुग्णालयात घालवल्यानंतर डॉ. मेहता यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. त्यांना जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले होते. मात्र त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यावर पुन्हा आय सी यू मध्ये दाखल करण्यात आलं. मागील 22 दिवस ते व्हेंटिलेटरवर होते. त्या काळात त्यांना एकमो (एक्सट्राकॉर्पोरल मेम्बरांस ऑक्सिजनेशन ) लावण्यात आले होते, त्यांच्या फुफ्फुसाची कार्यक्षमता मंदावल्याने त्यांना हे मशीन लावण्यात आले होते, जेणेकरून त्यांचा श्वासोच्छवास आणि शरीरातील रक्त वाहिन्यांना थेट ऑक्सिजन मिळण्यास मदत होईल. मात्र एक वेळ अशी आली की तेथील डॉक्टरांनी सल्लामसलत करून त्यांचे अहवाल विविध तज्ञ डॉक्टरांनी पहिले आणि त्यांना आता फुफ्फुसाच्या प्रत्यारोपणाची गरज असल्याचे निश्चित केले. त्यानंतर त्यांना चेन्नई येथील एम जी एम रुग्णालयात दोन दिवसापूर्वीच दाखल करण्यात आले आहे.
डॉ. मेहता यांना एअर अॅम्ब्युलन्सने चेन्नई येथे घेऊन जाणारे त्यांच्या सोबत प्रवासात असणारे त्यांचे सहकारी डॉ. जयेश ठक्कर ते स्वतः अॅनेस्थेसिस्ट असून ते सुरत अॅनेस्थेसिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, त्यांनी एबीपी माझा डिजिटलशी बोलताना सांगितले की, "आमच्या या सहकारी डॉक्टरला रुग्णांना उपचार देताना या कोरोनाचा संसर्ग झाला आणि त्यामुळे त्यांची तब्येत खूपच खराब झाली. ते सुरत येथील रुग्णालयातील आय सी यू मध्ये उपचार घेत असताना त्यांनी एक रुग्णाला वाचाविण्यासाठी शर्तीचे प्रयत्नही केले. परंतु आज त्यांची स्वतःची तब्येत बिकट आहे. त्यांच्या उपचाराकरिता एक कोटी रुपये इतका खर्च येणार असून त्यांच्यावर फुफ्फुसाचे प्रत्यारोपण करावे असे डॉक्टरांनी सूचित केले आहे. त्याकरिता आम्ही त्यांना चेन्नई येथे हलविले आहे. त्याचप्रमाणे त्यांच्यावर होणाऱ्या या उपचाराच्या खर्चाकरिता आम्ही डॉक्टर सहकाऱ्यांना मदतीचे आवाहनही केलं आहे. मदतीसाठी त्यांच्या बायकोच्या बँक खात्याची माहिती दिली होती. सध्या त्यांच्या खात्यावर पहिल्या 20-25 दिवस लागणाऱ्या खर्चाची रक्कम जमा झाली आहे. त्याचप्रमाणे आणखी मदतीकरिता गुजरात राज्याचे आरोग्यमंत्री नितीन पटेल यांनी मदत करण्यास सकारात्मकता दाखविली आहे. त्यांची आज भेट घेणार असून ते कशा पद्धतीने मदत करतील यावरून आम्ही पुढे निर्णय घेणार आहोत."
डॉ. ठक्कर पुढे असेही म्हणाले, "प्रत्यारोपणाचा निर्णय रुग्ण स्थिर झाल्यानंतर तज्ञ डॉक्टर घेणार आहेत. तसेच कोरोनाच्या काळात सर्व नागरिकांनी सर्व आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी डॉक्टर, परिचारिका आणि सहाय्यक यांना सहकार्य करावे. तसेच अशा प्रकारची वेळ कुठल्याही डॉक्टरवर आली तर डॉक्टरांनी सगळ्यांनी पुढे मदत करावी. "
डॉ. मेहता यांना चेन्नई येथील निष्णात डॉ. के आर बालकृष्णन यांच्या निगराणी खाली ठेवण्यात आले आहे. डॉ. बालकृष्णन यांनी आजपर्यंत शेकडोंच्या संख्येने फुफ्फुस आणि हृदय प्रत्यारोपण केले आहेत. महाराष्ट्रातील काही रुग्णांवर त्यांनी या पूर्वी हृदय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. डॉ बालकृष्णन यांनी सांगितले की, " आम्ही सगळे प्रयत्न करतोय की त्यांचा फुफ्फुसाचा संसर्ग लवकरात लवकर कमी व्हावा, त्या दृष्टीने त्यांच्यावर उपचार सुरु केले आहे. परंतु जर संसर्ग आटोक्यात आला नाही तर आम्हाला त्यांच्यांवर फुफ्फुस प्रत्यारोपण करावंच लागणार आहे. अशा स्वरूपाचे कोरोनामुळे एक दिल्ली येथील रुग्णाचे पूर्ण फुफ्फुस खराब झाले होते त्यांचे आम्ही प्रत्यारोपण केले आहे. सध्या तो रुग्ण व्यवस्थित आहे. "