धुळे : शिरपूर तालुक्यात (Shirpur Taluka) रानडुकरांचा (Wild Boar) हैदोस दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. रानडुकरांच्या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना शिरपूर तालुक्यातील आमोदे येथे घडली आहे. रानडुकराच्या या हल्ल्यामध्ये रक्तबंबाळ झालेल्या महिलेला तात्काळ परिसरातील नागरिकांनी शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. 


सताबाई रमेश भिल (40) असे या जखमी महिलेचे नाव आहे. ही महिला बकऱ्या चारत असताना रानडुकराने या महिलेवर अचानक हल्ला केला. त्यात रानडुकरांनी महिलेच्या उजव्या पायाला चावा घेत जोराने धडक दिली.  त्यामुळे महिला जमिनीवर पडल्याने जखमी झाली. 


महिलेवर उपचार सुरू


महिलेचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक तात्काळ मदतीसाठी धावून आले. त्यावेळी रक्तबंबाळ झालेल्या या महिलेला तात्काळ शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून या महिलेवर रुग्णालयात  उपचार सुरू आहेत. 


रानडुकरांचा बंदोबस्त लावण्याची मागणी


दरम्यान, शिरपूर तालुक्यातील आमोदे येथे रानडुकरांचा हैदोस वाढत आहे. आतापर्यंत अनेक जणांवर रानडुकरांनी हल्ला करून त्यांना जखमी केले आहे. तसेच शेतीपिकांचे देखील रानडुकरांनी मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत दखल घेऊन रानडुकरांचा बंदोबस्त लावण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.