Nashik Dhule News : दत्तक नियमावलीमध्ये सुधारणा झाल्याने सध्या धुळे (Dhule) जिल्ह्यातील दत्तक विधान प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने करण्यात येत आहे. धुळे जिल्ह्यात नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच 1 आंतरराष्ट्रीय दत्तक विधान तर 2 देशातंर्गत दत्तक विधान असे एकूण तीन दत्तक विधानाचे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) यांनी पारित केले आहेत. 


नवीन वर्ष हे प्रत्येकाच्या आयुष्यात नवी आशा, नवी दिशा घेऊन येत असते. यंदाच्या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच धुळे जिल्ह्यातील तीन अनाथ बालकांना (Orphan Child) हक्काचे पालक आणि घर मिळाले आहे. धुळ्याच्या संस्थेतील एका अनाथ बालकाला विदेशातील हक्काचे आई-बाबा (Adopt) मिळाले असून हे बालक लवकरच नवीन आई-बाबांसह इटलीला रवाना होणार आहे. या बालकांसोबतच इतर दोन बालकांचे अंतिम दत्तक विधान आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पारित केले आहेत. दत्तक नियमावलीनुसार न्यायालयासमोर होणारी दत्तक प्रकरणाशी संबंधित सर्व प्रक्रिया नवीन नियम लागू झाल्यापासून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. 
  
धुळे जिल्ह्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त एक विशेष दत्तक संस्था कार्यरत आहे. या संस्थेने नवीन दत्तक नियमावलीनुसार या बालकांचे परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडे सादर केले होते. त्याअनुषंगाने दत्तक ग्रहण समितीच्या निर्णयाच्या अधीन राहून जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या माध्यमातून बालकांच्या आणि पालकांच्या दस्तऐवजांची तपासणी करण्यात आली. हे प्रस्ताव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, धुळे यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना अंतिम आदेशाकरता सादर करण्यात आले होते. त्यानुसार या वर्षाच्या सुरुवातीलाच बदललेल्या नियमावलीनुसार दत्तक विधानाचे तीन अंतिम आदेश जिल्हाधिकारी शर्मा यांनी पारित केले आहेत.


आई-बाबासह इटलीला जाणार... 


धुळे शहरातील एका अनाथ बालकाला थेट इटलीतील दाम्पत्याला दत्तक देण्यात आले. तसेच अन्य दोन बालकांनाही दत्तक देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. तिन्ही बालकांच्या दत्तक विधानांच्या आदेश जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी काढले आहेत कायद्यात बदल झाल्यानंतर प्रथमच तीन अनाथ बालकांच्या दत्तक विधानांचे आदेश निघाले. त्यामुळे या बालकांना लवकर हक्काचे घर व आई-बाबा मिळणार आहेत. त्यानुसार धुळे शहरातील एका संस्थेतील एका अनाथ बालकाला विदेशातील आई बाबा मिळाले असून हा बालक लवकरच नवीन आई-बाबासह इटलीला रवाना होणार आहे. 


अशी असते प्रक्रिया 


संभाव्य दत्तक इच्छुक पालकाला कारा या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी लागते. नंतर 30 दिवसांच्या आवश्यक दस्ताऐवज पोर्टलवर अपलोड करावे लागतात. दत्तक विधानाची नियमावली असून दत्तक विधान मध्यस्थामार्फत होत नाही. त्यामुळे याप्रकरणी मध्यस्थ दिशाभूल करत असेल तर याविषयीची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला किंवा स्थानिक पोलिसांनी द्यावी अशी माहिती महिला व बालविकास अधिकारी सचिन शिंदे यांनी दिली आहे.