धुळे : स्वातंत्र्यदिनाचा (Independence Day) उत्साह देशभरात ओसंडून वाहत असून ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन (15 August) साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर धुळे शहरात  शहरात भाजपाच्या (BJP) वतीने तब्बल 1111 मीटर राष्ट्रध्वजाच्या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे शहरातील वातावरण देशभक्तीमय झाल्याचे पाहायला मिळाले. या मिरवणुकीत शालेय आणि महाविद्यालय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 


देशाचा 77 वा स्वातंत्र्यदिन उद्या 15 ऑगस्ट रोजी संपन्न होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजपच्या वतीने माजी जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली 1111 मीटर राष्ट्रध्वजाच्या रॅलीचे (Tiranga Rally) आयोजन करण्यात आले होते. शहरातील अग्रसेन पुतळा येथून या रॅलीला सुरुवात होऊन महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ या रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीत शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयिन विद्यार्थी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. या रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आवाहन केलेल्या 'मेरी मिट्टी मेरा देश' या अभियानाच्या पार्श्वभूमीवर माती आणि हिंदू संस्कृतीचे प्रतीक असलेल्या तुळशी ठेवलेली पालखीची मिरवणूक काढण्यात आली. 


दरम्यान जवळपास 1111 मीटर लांबीच्या तिरंग्याने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. कुणी घरातून, कुणी बाल्कनीतून, कुणी खिडकीतून हा सोहळा अनुभवत होते. तसेच या सोहळ्यात लहान मुलांसह आबालवृद्धांनी देखील मोठा सहभाग घेतला. सकाळी शहरातील अग्रसेन पुतळा येथून रॅलीची सुरवात होऊन महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ या रॅलीचा समारोप झाला. यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. शहराच्या मध्यवर्ती भागात लावण्यात आलेला राष्ट्रध्वज विविध मान्यवरांच्या हस्ते फडकविण्यात आला. यावेळी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि धुळेकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 


जिल्ह्यातील विविध भागात तिरंगा रॅली


धुळे जिल्ह्यातील विविध भागात आज 'माझी माती माझा देश' हे अभियान राबवण्यात आले. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता समारंभाच्या निमित्ताने हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश भागात विविध मार्गावरून रॅली काढून देशभक्तीपर गीतांचा जागर करण्यात आला. सोनगीर येथील ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावातून रॅली काढण्यात आली तर शिरपूर शहरात देखील हर घर तिरंगा तसेच तिरंगा बाईक रॅली उत्साहात पार पडली. या बाईक रॅलीमध्ये तरूणांसह तरुणींचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. त्यामुळे शहरात उत्साहाचे वातावरण होते. तसेच अनेकांनी देशभक्तिपर गीते सादर करून वातावरण देशभक्तिमय केले. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Independence Day 2023 : धुळ्यात 1100 फुटांची तिरंगा रॅली, रॅलीचं ठिकठिकाणी जोरदार स्वागत