Dhule Cotton News : राज्यात सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, काही भागात मुसळधार पाऊस (Rain) झाला आहे. या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. धुळे (Dhule) जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना (Cotton farmers) देखील अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. अति पावसामुळं कपाशीवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच रस शोषण करणाऱ्या अळीचा देखील प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळं कापसाचे उत्पन्न कमी होणार असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.


धुळे तालुक्यातील 30 हजार हेक्टर क्षेत्राला अतिवृष्टीचा फटका


धुळे तालुक्यात तसेच साक्री तालुक्यात यंदा पावसानं दमदार हजेरी लावली. यामुळं शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. पावसामुळं कपाशीच्या बोंडांचे नुकसान झाले असून, प्राथमिक अंदाजानुसार धुळे तालुक्यातील 30 हजार हेक्टर क्षेत्राला या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. गेल्या वर्षी धुळे तालुक्यात 1 लाख 7 हजार 109 हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली होती त्यात 77 हजार 295 हेक्टरवर कापूस होता. यंदा 1 लाख 747 हेक्टरवर पेरणी झाली असून, त्यापैकी तब्बल 84 हजार 961 हेक्टरवर कापसाची पेरणी करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाच्या लागवडीचे क्षेत्र अकरा हजार हेक्टरनं वाढलं आहे.




नुकसानीचे पंचनामे करावे, शेतकऱ्यांची मागणी


अतिवृष्टीमुळं कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच रस शोषण करणाऱ्या अळीचा देखील प्रादुर्भाव वाढला असून उत्पादनाचा एकीकडे खर्च वाढत असताना दुसरीकडे मात्र उत्पन्न कमी येणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. शेतकऱ्यांनी जून महिन्यापासून शेतीवर मोठा खर्च केला होता. फवारणी, निंदणी करुन खते देऊन पिके वाढवली. मात्र, पावसामुळं शेतकऱ्यांच्या हातात काहीही लागणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळं शासनाने नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.




राज्यातील 27 लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका


सुरुवातीला जून महिन्यात पावसानं दडी मारल्यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राज्यात मुसळधार पाऊस झाला होता. तसेच या चालू सप्टेंबर महिन्यात देखील काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. याचा खूप मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांमा बसला आहे. शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. तसेच अनेक ठिकाणी शेत जमिनी देखील खरवडून गेल्या आहे. या अतिवृष्टीचा राज्यातीस 27 लाख शेतकऱ्यांना फटका बसल्याची माहिती कृषीमंत्र्यांनी दिली आहे. तर काही ठिकाणी पशुधनाचं देखील नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढचे दोन ते तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.


महत्त्वाच्या बातम्या: