Continues below advertisement


धुळे : राज्यातील अनेक नगरपंचायती आणि नगरपरिषदांमध्ये भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून येत असल्याचं चित्र आहे. धुळ्यामधील दोंडाईचा नगरपरिषदेमध्ये (Dondaicha Nagar Panchayat) त्यापुढचे पाऊल पडले आहे. राज्याचे मंत्री जयकुमार रावल (Jaykumar Rawal ) यांच्या नेतृत्वाखाली या नगरपरिषदेमधील सर्व 26 जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. संपूर्ण बिनविरोध ठरणारी दोंडाईचा नगरपरिषद ही राज्यातील पहिलीच नगरपरिषद ठरली आहे.


दोंडाईचा नगरपरिषदेच्या स्थापनेनंतर यंदा पहिल्यांदाच निवडणूक होणार होती. मात्र या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले. त्यामुळे नगराध्यक्षांसह सर्व 26 जागांवर भाजपाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. दोंडाईच्या नगराध्यक्षपदी मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुमार रावल या बिनविरोध निवडून आल्या आहेत.


Dondaicha Nagar Panchayat Election : भावसारांचा अर्ज बाद झाल्याने न्यायालयात धाव


दोंडाईचा वरवाडे नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदासाठी मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुवर रावल आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार शरयू भावसार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र महाविकास आघाडीच्या उमेदवार शरयू भावसार यांच्या उमेदवारी अर्जावर भाजपकडून आक्षेप घेण्यात आला.


शरयू भावसार यांचे वडील अॅड. एकनाथ भावसार यांची घरपट्टीची थकबाकी असल्याचे कारण पुढे करत त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आली. त्यानंतर शरयू भावसार यांच्या कुटुंबीयांनी न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी धुळे जिल्हा न्यायालयात अपील करण्यात आल्याची माहिती त्यांच्या वतीने देण्यात आली आहे.


Maharashtra Election : राज्यात भाजपचे तीन नगराध्यक्ष बिनविरोध


नगर पंचायत आणि नगर परिषदेच्या मतदाना आधीच भाजपचे तीन नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आलेत. सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंयायत, धुळे जिल्ह्यातील दोंडाचा आणि आता जळगाव जिल्ह्यातील जामनेर नगरपालिकेत अध्यक्षपदी भाजप नेत्यांची बिनविरोध वर्णी लागली आहे.


दोंडाईच्या नगराध्यक्षपदी भाजप नेते जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुमार रावल या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. सोलापूर अनगर नगरपंचायतीमध्ये भाजप नेते माजी आमदार राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. तर जामनेरमध्ये गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांचीही बिनविरोध निवड झाल्याने भाजपने विजयी जल्लोष केला.


ही बातमी वाचा: