Continues below advertisement

सोलापूर : राज्यभर गाजलेल्या अनगर नगरपंचायतीचे नगराध्यक्षपदही (Angar Nagar Panchayat Election) आता तांत्रिकदृष्ट्या बिनविरोध झालं आहे. अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज अखेर मागे घेतला आहे. त्यामुळे आता 17 सदस्य बिनविरोध निवडून आले आणि आता नगराध्यक्षपदही बिनविरोध निवडून आलं आहे.

पहिल्यांदाच अस्तित्वात आलेल्या अनगर नगरपंचायतीची निवडणूक यंदा राज्यभर चर्चेचा विषय बनली. माजी आमदार आणि नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राजन पाटील यांनी सर्व 17 सदस्य बिनविरोध निवडून आणले. मात्र नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटे यांनी अर्ज भरल्यानंतर मात्र राजकीय राडा झाला.

Continues below advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा गटाच्या उमेदवार उज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर आरोप प्रत्यारोप झाले होते. त्यानंतर त्यांच्या अर्जावर आक्षेप घेणाऱ्या अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनीदेखील अर्ज मागे घेतला. त्यामुळे राजन पाटील यांच्या सूनबाई, प्राजक्ता पाटील या नगराध्यक्ष बनल्या आणि तांत्रिकदृष्ट्या अनगर नगरपरिषद बिनविरोध झाली.

Angar Nagar Panchayat Election : न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष

असं असलं तरी उज्वला थिटे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. माजी आमदार राजन पाटील यांनीच प्रशासनावर दबाव आणून आपला अर्ज बाद केल्याचा आरोप त्यांनी केला. अर्जावर सूचक म्हणून मुलाचे नाव असताना त्यावर सही नाही असं कारण देत प्रशासनाने उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद केला होता. मात्र उज्ज्वला थिटे यांनी याप्रकरणी राजन पाटील यांच्यावर आरोप केले. त्यामुळे या प्रकरणावर आता न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाला थिटे यांनी कोर्टात आव्हान दिलं आहे. प्राथमिक छाननीत सूचकाची स्वाक्षरी नसल्याचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितलं असतं तर ही वेळ आली नसती असं थिटे म्हणाल्या. निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि विजयी उमेदवार प्राजक्ता पाटील यांनाही पक्षकार करण्यात आलं आहे. न्यायालयात न्याय मिळेल अशी अपेक्षा उज्ज्वला थिटे यांनी म्हटलं.

Ujwala Thite Anagar Election : आपल्या जिवाला धोका

राजन पाटील यांनी आपल्या मुलावर हल्ला केल्याचा आरोप उज्ज्वला थिटे यांनी केला. राजन पाटील यांनी 200 लोक त्याला मारायला पाठवले असं त्यांनी म्हटलं. केवळ फॉर्म भरायचा म्हटल्यावर एवढा त्रास झाला, उद्या आम्ही गावात गेलो तर काय होईल याचा विचार करा असं थिटे यांनी म्हटलं. आपल्याला आणि आपल्या मुलाला काही करणार नाही अशी शपथ राजन पाटील आणि त्यांच्या मुलांनी अनगरसिद्धच्या पिंडीवर घ्यावी असं थिटेंनी म्हटलं आहे.

ही बातमी वाचा: