धुळे: संपूर्ण राज्यभरात मद्य तस्करीचे अनेक कारनामे करणारा धुळे जिल्ह्यातील शिरूड येथील रहिवासी असणारा दिनेश गायकवाड उर्फ दिनू डॉन याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून धुळे तालुका पोलीस गायकवाडच्या मागावर होते. अखेर सहा महिन्यांनंतर तालुका पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
नाशिकसह महाराष्ट्रातील गुटखा तस्करीचे रॅकेट चालविणाऱ्या गुटखा किंग म्हणून ओळख असलेल्या तुषार जगताप यास शिताफीने पोलिसांनी अटक केली. हे प्रकरण ताजे असतांनाच आता धुळे तालुका पोलिसांनी मद्य तस्करीत किंग असलेल्या दिनेश गायकवाडच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे बस स्थानकाजवळ त्याला ताब्यात घेतले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून धुळे जिल्ह्यातून मद्य तस्करीच्या अनेक घटना समोर येत आहेत. अनेकदा पोलिसांनी तस्करांचा पाठलाग तस्करी हाणून पाडली आहे. अशातच मद्य तस्करीची आंतरराज्य टोळी चालवणाऱ्या या दिनेश गायकवाडवर कारवाई करण्यात आल्यानंतर राज्यभरात विविध ठिकाणी केलेली मद्य तस्करी समोर येणार आहे.
राज्यातील विविध शहरात बनावट दारू तयार करून त्याची विक्री करणाऱ्या दिनेश गायकवाड याच्याविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात डिसेंबर 2022 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. धुळे तालुक्यातील कावठी येथे सुरू असलेला बनावट मद्याचा कारखाना तालुका पोलिसांनी उद्धवस्त केल्यानंतर याप्रकरणी नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र त्यातील मुख्य संशयित असलेला दिनेश गायकवाड हा गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होण्यात यशस्वी होत होता.
अखेर धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे पाठपुरावा करत त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. अखेर तब्बल सहा महिन्यानंतर दिनेश गायकवाड याला ताब्यात घेण्यात तालुका पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे बनावट मद्याची तस्करी करणाऱ्या टोळीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्राच्या ब्रँडेड बाटलीत गोव्याची हलकी दारु
ब्रँडेड दारुच्या नावाखाली बनावट दारु विक्रीचे प्रकार अनेकदा समोर आले आहे. दरम्यान असाच काही प्रकार छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यात देखील समोर आला आहे. गोव्याची हलकी दारु महाराष्ट्रातील ब्रँडेड बाटलीत भरणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधारासह दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने बेड्या ठोकल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. ज्यात एक स्कोडा कारचा मालक आणि त्याच्या साथीदाराचा त्यात समावेश आहे. त्यांच्याकडून आणखी एक कार व मोबाईल, असा 11 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने 26 जून रोजी ही कारवाई केली आहे.
ही बातमी वाचा :