भंडारा : बलात्कार, हत्येच्या आरोपातून दोषमुक्त झालेल्या तरुणाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला चोप  दिला आहे. भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील आथली या गावात ही घटना घडली आहे.  लाखांदूर पोलिसांनी बेड्या ठोकून आरोपीची  तुरुंगात पुन्हा  रवानगी केली. 


पाच वर्षापूर्वी गावातील अंगणवाडी केंद्राच्या मदतनीसवर अत्याचार करून तिची विटांनी ठेचून निर्घृण हत्या केल्याच्या आरोपाखाली तरुण कारागृहात होता. मात्र त्याच्याविरुद्ध हत्येचे सबळ पुरावे सादर करूनही शेवटच्या क्षणी या प्रकरणाचे जे साक्षीदार होते, त्यांनी न्यायालयात साक्ष फिरवल्यानं न्यायालयानं तरुणाची निर्दोष सुटका केली. दोन दिवसांपूर्वीच कारागृहातून बाहेर आल्यानंतर या वासनांध तरुणानं गावातीलचं एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीच्या प्रसंगावधानानंतर ग्रामस्थांनी तरुणाला पकडून चांगलेच बदडत पोलिसांच्या हवाली केलं. एखाद्या चित्रपटातील प्रसंगाप्रमाणे  ही घटना घडली आहे. 


दोन दिवसांपूर्वीच आरोपीची निर्दोष सुटका


राजू उर्फ राजेश व्यंकट शहारे (30) रा. आथली असं मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. पाच वर्षांपूर्वी या तरुणानं गावातीलच अंगणवाडी मदतनीसवर अत्याचार करून बिंग फुटू नये, म्हणून पीडितेला विटांनी ठेचून हत्या केल्याचा आरोप करून पोलिसांनी त्याची कोठडीत रवानगी केली. मात्र न्यायालयात प्रत्यक्षदर्शींनी साक्ष फिरवल्यानं न्यायालयानं त्याची दोन दिवसांपूर्वीच निर्दोष सुटका केल्यानं तो गावात पोहचला होता.


आरोपीला बेदम चोप 


 अत्याचार आणि हत्येच्या आरोपानंतर तो सुटका होऊन गावात पोहचल्यानं गावात काहीअंशी दहशत होती. मात्र कारागृहात राहून आल्यानं तो सुधारला असेल असा विश्वास काहींना असतानाचं त्यानं पुन्हा एकदा गावातील एका अल्पवयीन मुलीवर वाईट नजर टाकली. अगदी सकाळच्या सुमारास एकांतवासाचा फायदा उचलून मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न अरोपीनं केला. यावेळी मुलीनं आरोपीचा प्रतिकार करून स्वतःची सुटका करून घेतली. याची माहिती होताच ग्रामस्थांनी आरोपी तरुणाला पकडून बेदम चोप देत लाखांदूर पोलिसांच्या हवाली केलं.


 अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणात आरोपी असलेला यातून कारागृहात असताना यात महत्त्वाची साक्ष असलेल्या गावातीलच साक्षदारांनी न्यायालयात साक्ष फिरवल्यानं आरोपींची निर्दोश सुटका झाली. त्यामुळं कारागृहातून गावात पोहचलेल्या तरुणाची हिंमत वाढल्यानं त्यानं पुन्हा अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानं आता त्यांनी फिरवलेल्या साक्षीनंतर, ग्रामस्थांना त्यांची चूक लक्षात आल्याची भावना व्यक्त होत आहे.