Dhule News : पोलीस निरीक्षक प्रवीण कदम (PI Praveen Kadam) यांच्या आत्महत्येमागील कारणाचा शोध घेण्यासाठी आता नऊ वर्षांपूर्वीच्या नाशिक अपघाताची चौकशी पोलिसांकडून केली जाणार आहे. धुळे (Dhule) इथल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात दोन दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षक प्रवीण कदम यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या एका चिठ्ठीत गंगापूर रोड येथील अपघाताचा गुन्हा त्यास कारणीभूत असल्याचं लिहिलं होते. त्यांच्या या सुसाईड नोटमुळे (Suicide Note) पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून नाशिक इथल्या गंगापूर रोड पोलीस ठाण्यातील कोणत्या अपघाताचा गुन्हा प्रवीण कदम यांना आत्महत्येस कारणीभूत ठरला याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभं राहिलं आहे. 


कोणत्या गुन्ह्याचा तपास आत्महत्येसाठी कारणीभूत ठरला?
प्रवीण कदम हे 2013 मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर गंगापूर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांच्या दीड वर्षाच्या कार्यकाळात त्यांच्याकडे दोन अपघाताच्या गुन्ह्यांचा तपास होता. यापैकी कोणत्या गुन्ह्याचा तपास त्यांना आत्महत्या करण्यास कारणीभूत ठरला याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येणार आहे. तसंच त्यांच्यावर अपघाताच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी वरिष्ठांकडून काही दबाव होता का, तसंच या दबावातून त्यांनी हे पाऊल उचलले आहे का अशा अनेक चर्चांना या घटनेमुळे उधाण आलं आहे.


पोलीस प्रशिक्षक केंद्रातील निवासस्थानी आत्महत्या
धुळे शहरातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असणारे प्रवीण कदम यांनी आपल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सह्याद्री अपार्टमेंटमधील निवासस्थानात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली होती. पोलीस अधिकाऱ्यांनी प्रवीण कदम यांच्या निवासस्थानाची पाहणी केली. यावेळी त्यांना या ठिकाणी एक सुसाईड नोट मिळून आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


प्रवीण कदम हे उत्तम बासरी वादक तसेच कॅसिओ वादक होते. त्यांना संगीताची आवड होती. तसंच प्रवीण कदम हे सर्पमित्र देखील होते. त्यांनी आत्महत्या का केली हे मात्र अद्याप समजू शकलं नाही. यासंबंधी पोलिस अधिक तपास करत आहेत. मात्र त्यांच्या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे.  


सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं आहे?
माझ्या आत्महत्येस मी स्वतः जबाबदार असून इतर कोणालाही दोषी धरु नये, गंगापूर पोलीस स्टेशन येथील फेटल गुन्हा त्यास कारणीभूत आहे, असं पीआय प्रवीण कदम यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. 


संबंधित बातमी


Dhule: धुळ्यातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात पोलिस निरीक्षकाची आत्महत्या; सुसाईड नोट पोलिसांच्या हाती