धुळे : अलीकडील काळात शाळांमधील शिक्षकांचे कारनामे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच धुळे (Dhule) जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. तालुक्यातील जिल्हा परिषदेत शाळेतील एक शिक्षिका चार वर्षांपासून शाळेत आलीच नसून फक्त दर महिन्याला पगारासाठी येत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेत ठिय्या (Protest) मांडून शिक्षिकेची हकीकत कथन केली. 


धुळे (Dhule) तालुक्यातील दोंदवाड येथील जिल्हा परिषदेच्या (ZP School) शाळेत गेल्या दोन वर्षांपासून एकही शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांची परवड होत आहे. याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या. परंतु, त्यांनी कोणतीही दखल न घेतल्याने अखेर आज ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांसह जिल्हा परिषदेचे कार्यालय गाठले. यावेळी विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळेकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार केला. तसेच विद्यार्थ्यांनी सीईओंची भेट घेत, 'आम्हाला खाऊ नको, शिक्षक द्या', अशी विनवणी केली. याची तातडीने दखल घेत सीईओ शुभम गुप्ता यांनी आठ दिवसांत शिक्षकाची नेमणूक करण्याचे आश्वासन दिले आहे. 


ग्रामीण भागातील मुला- मुलींसाठी जिल्हा परिषदेच्या शाळा मोठ्या आधार ठरतात. परंतु, गेल्या काही दिवसांपासून शासनासह व प्रशासनाला मराठी शाळा जिवंत ठेवायच्या आहेत की नाही? असा प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहे. कारण अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षकांची संख्या खुपच कमी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दोंदवाड येथील जि.प. मराठी शाळेत 1 ली ते 4 थीच्या वर्गासाठी गेल्या दोन वर्षांपासून शिक्षक नसल्याने येथील ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी आज थेट परिषदेचे कार्यालय गाठले. शिक्षणाधिकाऱ्यांकडे (Education Officer) वेळोवेळी शिक्षकांची मागणी करुनही शाळेला शिक्षक दिले जात नसल्याने संताप व्यक्त केला. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनीही निदर्शने करत प्रशासनाचा निषेध केला. 


खाऊ नको, शिक्षक द्या, विद्यार्थ्यांची मागणी 


यावेळी विद्यार्थ्यांनी सीईओ शुभम गुप्ता (CEO shubham Gupta) यांची भेट घेतली. तसेच आम्हाला खाऊ नको, शिक्षक द्या, अशी आर्त विनवणी केली. त्यावर सीईओ गुप्ता यांनी येत्या आठ दिवसांत तीन शिक्षकांची नेमणूक करण्याची ग्वाही दिली. यावेळी ग्रा.पं.सदस्य रविंद्र बिऱ्हाडे म्हणाले की, दोंदवाड गावातील मराठी शाळेतील शिक्षिका गेल्या चार वर्षांपासून बेपत्ता आहे. मात्र, दर महिन्याला या शिक्षिकेला दोंदवाड शाळेतून पगार अदा केला जातो, असा अजब कारभार सुरु असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. येत्या आठ दिवसांत शाळेला शिक्षक न दिल्यास यापेक्षा मोठ्या संख्येने येवून आंदोलन करू, असा इशाराही बिऱ्हाडे यांनी यावेळी दिला. याप्रसंगी दोंदवाड गावाचे ग्रा.पं. सदस्य, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनीही विद्यार्थ्यांसोबत सीईओंच्या दालनात बाजू मांडली.



इतर महत्वाची बातमी : 


Pune School News : एक शाळा, एक शिक्षक, एकच विद्यार्थिनी; एका विद्यार्थिनीला शिकवण्यासाठी शिक्षिकेचा डोंगरदऱ्यातून 45 किमीचा प्रवास