Dhule News धुळे : गावकी आणि भावकीचं राजकारण सगळ्यात अवघड असे बोलले जाते. गाव स्थरावरील राजकारणात अहंकारातून अनेकदा टोकचे पाऊल उचलल्याने गंभीर घटना घडत असतात. अशीच एक धक्कादायक घटना धुळे येथे सात वर्षापूर्वी घडली होती. धुळे तालुक्यातील अनकवाडी गावात दिवंगत सरपंच पीतांबर चव्हाण आणि त्यांचा मुलगा पृथ्वीराज यांचा राजकीय वैमनस्यातून खून करण्यात आला होता. याप्रकरणी अखेर जिल्हा न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली आहे. या खून प्रकरणातील सर्व 14 आरोपींना एकाच वेळी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. धुळे शहर आणि तालुक्यात गुन्हेगारीचा आलेख मागील काही काळात वाढताना दिसत आहे. मात्र, सात वर्षापूर्वी अनकवाडी येथे झालेल्या खून प्रकरणात सर्व 14 आरोपींना झालेल्या जन्मठेपेच्या शिक्षेमुळे गुन्हेगारांना चांगला संदेश मिळल्याच बोललं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सन 2016 साली धुळे तालुक्यातील अनकवाडी गावचे सरपंच पितांबर चव्हाण आणि मुलगा पृथ्वीराज यांचा राजकीय विरोधकांनी खून केला होता. 2016 साली पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत चव्हाण यांचा विजय झाला होता. मात्र, त्यांना सरपंचपदी जास्त काळ कामकाज करता आले नाही. कारण जेव्हापासून पितांबर चव्हाण सरपंचपदी विराजमान झाले होते, तेव्हा पासूनच त्यांच्या विरोधकांना ती बाब खटकत होती. त्यांच्या राजकीय विरोधकांना पराभव सहन न झाल्याने त्यांनी चव्हाण यांचा काट काढण्याचा निर्धार केला. योग्य संधी मिळताच चव्हाण यांना धडा शिकवायचा अश्या उद्देशाने त्यांनी पाळत ठेवली. 18 मे 2016 रोजी पितांबर चव्हाण आणि त्यांचा मुलगा पृथ्वीराज चव्हाण शेताकडे जात असताना त्यांच्यावर हल्ला केला.
18 मे 2016 रोजी दिवंगत सरपंच पितांबर चव्हाण आणि त्यांचा मुलगा पृथ्वीराज चव्हाण रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास शेताकडे निघाले होते. आपल्या दुचाकीवरून ते दोघे दुचाकीवरून शेतात जात असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. धारदार शस्त्र, दांडके यांच्या सहाय्याने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवण्यात आला. या अत्यंत धक्कादायक घटनेत दोघांचाही मृत्यू झाला होता. पितांबर चव्हाण यांचे राजकीय विरोधक असलेल्या नंदू खिळे, दीपक खिळे, कौतिक खेळे, प्रवीण क्षीरसागर, हिलाल मोरे, बटू निंबाळकर, रमेश निंबाळकर, सागर खिळे, गणेश मोरे, धनंजय मोरे, विनायक खिळे, कारभारी खिळे, पांडुरंग खिळे, शरद खिळे आणि एक अल्पवयीन मुलगा हे ट्रॅक्टर मधून आले त्यांनी चव्हाण पिता-पुत्रांवर हल्ला करत त्यांचा खून केला होता. याप्रकरणी धुळे तालुका पोलिसांनी तपास करत पुरावे न्यायालयात सादर केले होते. 14 आरोपी असलेल्या या प्रकरणात अखेर सात वर्षानंतर न्यायालयाने आरोपींना शिक्षा ठोठावली आहे. सर्वच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एकाच वेळी सर्वच्या-सर्व 14 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याचा निकाल प्रथमच सुनावण्यात आल्याचं देखील बोललं जात आहे.