धुळे : काही महिन्यापूर्वी चर्चेत आलेल्या धुळ्यातील टिपू सुलतानचा चौथरा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हा चौथरा संबंधित ठिकाणाहून काढून टाकण्यात आला असला तरीही याबाबतच वाद अद्यापही मिटलेला दिसून येत नाही. आता सकल हिंदू समाजातर्फे संबंधितांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी निवदेनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत धुळे पोलीस अधीक्षकांकडे याबाबत निवेदन देण्यात आले आहे. 


धुळे शहरातील वडजाई रोडवर एका चौकाचे सुशोभीकरण करून यात चबुतरा करण्यात आला होता. या चौकाला टिपू सुलतान यांचे नामकरण करण्यात आले होते. या प्रकारामुळे धुळ्यात हिंदू समाज संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. यानंतर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून ठेकेदाराला संबंधित चबुतरा काढण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार स्वात ठेकेदाराने हा चबुतरा काढून घेतला होता. मात्र आता सकल हिंदू समाजाकडून हिंदू बांधवांच्या भावना दुखावण्याची काम केल्याचा ठपका ठेवत संबंधितांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
    
निवेदनात म्हटले आहे, कि स्थानिक आमदाराने शासकीय निधीचा दुरोपयोग करून टिपू सुलतानचे स्मारक विनापरवानगी उभारून शासकीय यंत्रणा पायदळी तुडविण्याचे काम केले आहे. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम या माध्यमातून केले जात असल्याचा आरोप करत संबंधितांवर कारवाई व्हावी, अन्यथा सकल हिंदू समाज तीव्र आंदोलन छेडेल याची नोंद प्रशासनाने घ्यावी असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी जेव्हा वाद झाला होता त्यावेळी, मुख्यमंत्री, गृह मंत्री तसेच पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त (धुळे) यांच्याकडे तक्रार अर्ज करण्यात आला. त्याची दखल घेत प्रशासनाने संबंधित ठेकेदाराकडुन तो चौथरा निष्कासित केला होता. त्यानंतर काही समाजकंटकाकडून धमक्या येत असल्याचा आरोप करत हे निवेदन देण्यात आले आहे. 


काय आहे प्रकरण? 


जून 2023 मध्ये धुळे शहरातील वडजाई रोडवर एका चौकाचे सुशोभीकरण करून यात चबुतरा बांधण्यात आला होता. या चौकात टिपू सुलतान असे नामकरण करण्यात आले होते. यानंतर धुळ्यातील हिंदुत्ववादी संघटनानी आक्रमक भूमिका मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेत चबुतरा काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार लागलीच काही दिवसांनी संबंधित ठेकेदारांच्या माध्यमातून चबुतरा काढण्यात आला. त्यामुळे हा वाद इथेच मिटला होता.. मात्र आता सकल हिंदू समाजाकडून संबंधितांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासन याबाबत गुन्हा नोंद करणार का? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.


इतर महत्वाची बातमी : 


Dhule News : 'आजोबांसमोरच नातवाला बिबट्यानं ओरबाडलं', हल्ल्यात सहा वर्षीय बालकाचा मृत्यू, धुळे तालुक्यातील घटना