Vande Bharat: मुंबई-गोवा मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. त्यासाठी मंगळवारी (16 मे) यशस्वी चाचणी देखील घेण्यात आली. सध्या मुंबई ते शिर्डी धावणाऱ्या गाडीचा वापर चाचणीसाठी करण्यात आला. गोव्याच्या दिशेने मुंबईहून पहाटे 5.35 वाजता वंदे भारत एक्सप्रेस सुटली. 16 डब्यांची वंदे भारत एक्स्प्रेस सीएसएमटी स्थानकातून सुटली, ती गोव्यात मडगावला दुपारी 2.30 दरम्यान पोहोचली. वंदे भारत एक्सप्रेसला मिळणारा प्रतिसाद पाहून मुंबई-गोवा मार्गावर देखील ही एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली होती.


मुंबईहून सुटणाऱ्या वंदे भारतचा हा चौथा मार्ग असणार आहे. याआधी मुंबई ते अहमदाबाद, मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) धावत आहेत. या मार्गांवर मिळालेला चांगल्या प्रतिसादानंतर मुंबई-गोवा मार्गावर देखील ही एक्सप्रेस चालवण्यात येणार आहे. कोकणवासियांनी या नव्या कोऱ्या गाडीचा फायदा होणार आहे. नव्या वंदे भारत एक्सप्रेसमुळे कोकणवासियांचा प्रवास देखील आरामदायी होणार आहे.


वंदे भारत एक्स्प्रेसचा वेग प्रति तास 180 किमी


मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी हायस्पीड रेल्वेचा पर्याय उपलब्ध होणार आहे. मुंबई-गोवा रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेसची चाचणी घेतली गेली आहे. मुंबई ते मडगाव मार्गावर मंगळवारी यशस्वी चाचणी घेतली गेली, या वंदे भारत रेल्वेचा वेग चांगला असल्याने कमी वेळात गोव्यात पोहोचणे शक्य येणार आहे. या गाडीचा कमाल वेग 180 किमी प्रति तास आहे. या अत्याधुनिक रेल्वेमध्ये जीपीएस बेस्ड पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम (GPS based Pssenger Information System), बायो वॅक्युम टॉयलेट्स (Bio-vacuum Toilets), ऑटोमॅटिक दरवाजे (Automatic Doors), वायफाय (Wi-Fi) आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टिम (Regenerative Breaking System) आहे. 


मुंबईतून सुटणारी ही चौथी वंदे भारत एक्स्प्रेस


मुंबईतून सुटणारी ही चौथी वंदे भारत एक्स्प्रेस असणार आहे. यापूर्वी मुंबई सीएसएमटी-अहमदाबाद-गांधीनगर, मुंबई सीएसएमटी-साईनगर शिर्डी, मुंबई सीएसएमटी-सोलापूर या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. आता मुंबई सीएसएमटी ते गोवा मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे.


चाचणी यशस्वी झाल्यावर दाखवला जाणार हिरवा झेंडा


वंदे भारत एक्सप्रेसची मुंबई-गोवा मार्गावरील चाचणी यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे, लवकरच मुंबई सीएसएमटी-मडगाव मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे.


हेही वाचा:


Municipal Corporation Elections : राज्यातील रखडलेल्या महापालिका निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार?