Aryan Khan Drugs Case: अभिनेता शाहरुख खानच्या मुलासह अटक करण्यात आलेल्या कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील मॉडेल मुनमुन धामेचा (Munmun Dhamecha) हिने एनसीबीचे वादग्रस्त माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. माध्यमांचे लक्ष वेधून घेण्याच्या उद्देशाने वानखेडे यांनी आपल्याला फसवल्याचा दावा तिने केलाय. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिने हा दावा केलाय. 


सीबीआयनं समीर वानखेडे यांच्यावर रेड टाकल्यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचवेळी कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणातील आरोपी असलेल्या मुनमुन धामेचा हिने देखील वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत. आर्यन खान याला अटक करण्यात आली होती, त्याच्या सोबतच मॉडेल असलेली मुनमुन धामेचा हिला देखील एनसीबीनं अटक केली होती. या दोघांवरही ड्रग्ज बाळगल्याचे आरोप ठेवले होते. समीर वानखेडे हे एक शक्तीशाली अधिकारी होते, त्यामुळे भीतीपोटी त्यांच्याविरोधात बोलण्याचं धाडस झालं नव्हतं, आता सीबीआयनं गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही हे बोलू शकतो असं मुनमुन धामेचा म्हणाली.  


सीबीआयनं समीर वानखेडेंवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात सत्य समोर येईलच. मात्र फक्त प्रसिद्धीपोटी समीर वानखेडे यांनी अनेकांना खोट्या प्रकरणात गुंतवल्याचा आरोप धामेचा हिच्याकडून करण्यात आला आहे. वानखेडे सातत्याने मॉडेल्स आणि सेलिब्रिटींना टार्गेट करत होते. कारण त्यांना माहिती होतं याला माध्यमं प्रसिद्धी देतील असा आरोप तिने केला आहे. 


Munmun Dhamecha Allegation On Sameeer Wankhede : मुनमुन धामेचा हिने समीर वानखेडे यांच्यावर केलेले आरोप


मुनमुन धामेचा हिने समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केलेत. ती म्हणाली की, मी तुलनेनं अनोळखी मॉडेल आहे आणि मला क्रूझमध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण मिळाले होते. क्रूझवर आल्यावर मला एक रुम देण्यात आली. त्यानंतर तिथे अधिकाऱ्यांनी छापा टाकला. मात्र तेव्हा रुम माझ्या ताब्यात नव्हती, तेव्हाच त्यांना तिकडे ड्रग्ज सापडलेत. त्यावेळी तिकडे इतर व्यक्ती हजर होते. मात्र एनसीबीचे अधिकारी व्हीव्ही सिंग यांच्याशी झालेल्या संभाषणानंतर त्यांना सोडण्यात आले. त्यांच्याकडे ड्रग्ज असूनही त्यांना सोडण्यात आलं. 


सुरुवातीला समीर वानखेडे यांनी मला आश्वासन दिले की काळजी करण्यासारखं काहीही नाही. कारण माझ्यासंदर्भात काहीही दोषी आढळलं नाही, त्यामुळे जाण्याची परवानगी देण्याआधी काही औपचारिकता पूर्ण कराव्या लागतील असं सांगण्यात आलं. मात्र मी एक मॉडेल असल्याचं लक्षात येताच त्यांना मला अटक केली. मला कोर्टात हजर केले गेले, त्यांनी मला माझ्या कुटुंबाशी बोलूही दिलं नाही. सोबतच वकील बदलण्यासाठी बळजबरी करण्यात आली. 


दरम्यान, मुनमुन धामेचा हिच्यावर एनसीबीच्या एसआयटीद्वारे आरोप ठेवण्यात आले होते. डिप्रेशनमध्ये गेल्यामुळे तिने चरसचं सेवन केल्याचं स्टेटमेंटमध्ये मान्य देखील केलं होतं. मुनमुन हिने 5 ग्रॅम चरस खरेदी केल्याचं देखील स्टेटमेंटमध्ये मान्य केलं होतं. जेव्हा एनसीबीनं तिच्या केबिनची झाडाझडती घेतली त्यानंतर तिने ते घाबरुन फेकून दिले. त्यानंतर तेच चरस एनसीबीच्या टीमनं सील करत जप्त केल्याचं म्हंटलंय. 


नवाब मलिकांनी आरोप केल्यानंतर एनसीबीच्या या केसची अंतर्गत चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर एनसीबीच्या ज्ञानेश्वर सिंह या अधिकाऱ्याने एक अंतर्गत रिपोर्टच्या हवाल्याने वनखेडेंसोबतच एनसीबीच्या दोन अधिकाऱ्यांवर सीबीआयनं गुन्हा दाखल केलाय. त्यामुळे आता याप्रकरणी पुढे काय होतं हे बघणं महत्त्वाचं असेल. 


ही बातमी वाचा :