Ajun Khotkar : धुळे (Dhule) शहरातील शासकीय विश्रामगृह (गुलमोहर रेस्ट हाऊस) येथील रूम क्रमांक 102 मधून पोलिसांनी (Police) 1 कोटी 84 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. या प्रकरणाने शहरात खळबळ उडाली असून, माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote) यांनी याप्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांचे खाजगी स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांनी गेस्ट हाऊसमध्ये रूम बूक केली होती. 15 मे पासून गेस्ट हाऊसमधील रूम क्रमांक 102 राखीव केली होती. या रूममध्ये पाच कोटी रुपये असल्याचा संशय अनिल गोटे यांना होता. त्यांनी रविवारी रात्री या रूमबाहेर कार्यकर्त्यांना घेऊन ठिय्या आंदोलन केलं होतं. यानंतर प्रशासनाने ही रूम उघडली असता या रूममध्ये तब्बल एक कोटी 84 लाख 84 हजार 200 रुपयांची रोकड आढळली आहे. आता या प्रकरणावर अर्जुन खोतकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.    

Continues below advertisement


अर्जुन खोतकर म्हणाले की, आरोप करायला काय? आरोप कोणी काहीही करू शकतं, खरंतर आमच्या समितीचा याविषयी कुठलाच काहीही संबंध नाही. सर्व आरोप आम्ही फेटाळतो. या समितीला आणि सरकारला बदनाम करण्यासाठी हे प्लांट केलेले आहे का? असा संशय आम्हाला येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 


अनिल गोटेंच्या आरोपात तथ्य नाही


धुळ्याच्या गुलमोहर शासकीय विश्रामगृहात (Gulmohar Government Rest House) आमदारांना देण्यासाठी पाच कोटी रुपये आणल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote) यांनी केला होता. याबाबत विचारले असता अर्जुन खोतकर म्हणाले की, त्यांच्या आरोपात कुठेही तथ्य नाही. त्यांची ही जुनी सवय आहे, अशा पद्धतीने आरोप करायचे आणि समितीला बदनाम करायचं. शासनाला बदनाम करायचं. त्यामुळे या आरोपात कुठलेही तथ्य नाही आणि आम्ही हे सर्व आरोप फेटाळतो, असे त्यांनी म्हटले.  


पीएच्या नावाने ती रूम बुक नव्हतीच


आमदार अर्जुन खोतकर यांचे खाजगी स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावाने गेस्ट हाऊसमध्ये रूम बूक केल्याची माहिती समोर आली होती. याबाबत विचारले असता अर्जुन खोतकर म्हणाले की, हे साफ चुकीचं आहे, हे साफ खोटं आहे. त्याच्या नावाने ती रूम बुक नव्हतीच. मी त्याच्याशी बोललो आहे. तू त्या रूममध्ये राहत होता का? असे विचारले आहे. मात्र तो तिथे राहत नव्हता, तो दुसऱ्या रूममध्ये राहत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. आता अर्जुन खोतकर यांनी सर्व आरोप फेटाळल्यानंतर अनिल गोटे नेमकं काय बोलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  



आणखी वाचा 


Dhule News : धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहात सापडलं कोट्यवधींचं घबाड, अनिल गोटेंचा 'तो' आरोप खरा ठरला; पोलिसांनी 102 क्रमांकाची खोली उघडली अन्...