Dhule News : धुळ्याच्या गुलमोहर शासकीय विश्रामगृहात (Gulmohar Government Rest House) आमदारांना देण्यासाठी पाच कोटी रुपये आणल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote) यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर अनिल गोटे यांनी विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 ला बाहेरून कुलूप लावून तेथेच ठाण मांडले होते. तसेच, ही खोली जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीतच उघडण्यात यावी, अशी मागणीही गोटे यांनी केली होती. अखेरी पोलीस अधिकारी, सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या खोलीचा पंचनामा करण्यात आला. यावेळी खोली क्रमांक 102 चे कुलूप कटरने तोडत अधिकाऱ्यांनी खोलीमध्ये प्रवेश केला. खोलीत घेतलेल्या झडतीत तब्बल एक कोटी 84 लाख 84 हजार 200 रुपयांची रोकड आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र विधीमंडळातील अंदाज समिती तीन दिवसीय दौऱ्यासाठी सध्या धुळे जिल्ह्यात दाखल झाली आहे.या दौऱ्यात समिती धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेणार आहे. एकूण 29 आमदारांचा समावेश असलेल्या या समितीचे नेतृत्व आमदार अर्जुन खोतकर करत आहेत. त्यापैकी 11 आमदार सध्या धुळ्यात दाखल झाले आहेत. दरम्यान, या आमदारांना देण्यासाठीच पाच कोटी रुपयांची रक्कम गुलमोहर विश्रामगृहात आणण्यात आली होती, असा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.
एक कोटी 84 लाख 84 हजार रुपयांची रोकड सापडली
खोली क्रमांक 102 मध्ये रोकड असल्याची माहिती मिळाल्यानंतर, माजी आमदार अनिल गोटे यांनी प्रशासनाकडे तत्काळ चौकशीची मागणी केली होती. या मागणीस पाठिंबा देण्यासाठी त्यांनी खोली क्रमांक 102 च्या बाहेर तब्बल पाच तास ठिय्या आंदोलन केले. अखेर पोलीस अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा प्रक्रिया पार पडली. यावेळी खोलीचे कुलूप कटरच्या सहाय्याने तोडण्यात आले आणि अधिकाऱ्यांनी खोलीत प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या तपासणीत एक कोटी 84 लाख 84 हजार 200 रुपयांची रोकड सापडली आहे. तब्बल सहा तासांच्या मोजणीनंतर पोलिसांनी पंचनामा करून रोकड जप्त केली आहे. आज पहाटेपर्यंत शासकीय गुलमोहर विश्रामगृह याठिकाणी रोख रक्कम जप्त करण्याची कारवाई सुरू होती. याप्रकरणी आज धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच जप्त करण्यात आलेली रक्कम देखील पोलिसांनी ताब्यात घेतली असून याप्रकरणी आता पोलीस प्रशासन काय कारवाई करते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अर्जुन खोतकरांनी अनिल गोटेंचे आरोप फेटाळले
महाराष्ट्र विधीमंडळातील अंदाज समिती नेतृत्व करणारे आमदार अर्जुन खोतकर यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. अनिल गोटे यांनी केलेले सर्व आरोप अर्जुन खोतकर यांनी फेटाळले आहेत. विश्रामगृहात सापडलेले पैसे आणि समितीचा काहीच सबंध नसल्याचा दावा अर्जुन खोतकर यांनी एबीपी माझाशी बोलताना केला आहे. माझा पीए त्या रूममध्ये राहत नव्हता, हे सर्व प्लांट केले गेले असल्याचा आरोप खोतकर यांनी केला आहे.
रोहित पवारांची प्रतिक्रिया
या प्रकरणावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलंय की, एखाद्या चांगल्या कामगिरीसाठी रोख रकमेचं बक्षीस दिलं जातं... धुळ्यात गेलेल्या अंदाज समितीनेही अशी काही दैदिप्यमान कामगिरी केली असेल का? आणि म्हणून त्यांना ‘बक्षिस’ देण्यासाठी कोट्यवधी रुपये रक्कम जमा केले असतील का? हा संशोधनाचा विषय आहे. पण अवकाळी पावसाप्रमाणे आ. अनिल गोटे साहेब त्या १०२ क्रमांकाच्या खोलीत अचानक हजर झाले आणि त्यांच्यामुळं अंदाज समितीच्या ‘दैदिप्यमान कामगिरी’वर आणि ‘बक्षिस’ म्हणून मिळणाऱ्या रकमेवरही पाणी फेरलं गेलं, असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा