तुळजापूर : तुळजापूरच्या (Tuljapur Temple) तुळजाभवानी देवीला मोठ्या श्रद्धेनं भाविन सोनं चांदी अर्पण करतात. हेच सोनं आणि चांदी वितळवण्याला रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank OF India) परवानगी दिलेली आहे. धाराशीवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी ही माहिती दिली आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये तुळजाभवानीच्या चरणी मोठ्या प्रमाणावर सोनं आणि चांदी वाहण्यात आली. याच 200 किलो सोनं आणि सुमारे साडे चार हजार चांदीच्या दागिन्यांना आता वितळवलं जाणार आहे. हे सोनं - चांदी वितळवून त्याचे मोठे ब्लॉक केले जातील.
वितळवण्यात आलेल्या सोन्यांचे ब्लॉक राष्ट्रीयकृत बँकेत ठेवले जातील, ज्यातून मंदिराला भविष्यात उत्पन्न मिळणार आहे. शिवाय मंदिर संस्थानवर असलेली ही सोनं आणि चांदीच्या सुरक्षेची जबाबदारी कमी होईल. हे सोनं वितळवल्यानंतर 50 ते 60 टक्के प्युअर सोनं मिळेल असा अंदाज आहे. सोनं चांदी वितळवण्याची पारदर्शक पद्धत अभ्यासण्यासाठी तुळजाभवानी मंदिराचे पदाधिकारी मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराला भेट देणार आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या चरणी भक्तांनी अर्पण केलेल्या सोने दागिने वितळवण्यास विधी व न्याय विभागाने मंजुरी दिली आहे. लवकरच ही प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. भक्तांनी 2009 पासून 207 किलो सोने आणि 2 हजार 570 किलो चांदी अर्पण केली आहे त्यातील सोने वितळविले जाणार आहे. 207 किलो सोनेपैकी 111 किलो शुद्ध सोने मिळू शकते असा अंदाज आहे. यापूर्वी देवीकडे 47 किलो शुद्ध 24 कॅरेट सोने आहे. यानंतर देवीकडे जवळपास दीडशे किलो शुद्ध सोने जमा होऊ शकते. देवीच्या डब्यातील पुरातन दागिने मोजदाद प्रकरणी चौकशी समितीने दिलेल्या अहवालावर मंदीर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी बैठक घेतली. अहवालावर चर्चा करुन समितीने काढलेल्या निष्कर्षानंतर कायदेशीर काय कारवाई करायची यासाठी विधी विभागाचे मार्गदर्शन मागविले आहे.
येत्या आठवड्यात अंतीम अहवालावर कायदेशीर मार्गदर्शन येण्याची शक्यता आहे.काही सोन्याची दागिने , चांदीच्या वस्तू गायब आहेत तर काही दागिन्याचे वजन आश्चर्यकारकरित्या वाढले आहे. तुळजाभवानी देवीचे पुरातन दागिने गहाळ प्रकरणी एका महंतासह तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक व इतर काही मानकरी यांना अंतीम खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते त्यानुसार अंतीम अहवाल सादर केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अनेक राजघराण्यांनी देवीला अर्पण केलेल्या नाणे चोरी प्रकरणी यापूर्वीच गुन्हा नोंद झाला असुन त्यात एकही नाणे पोलिसांना तपासात हस्तगत झाले नाही, ते प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे यासह इतर बाबीवर काय कारवाई करायची यासाठी कायदेशीर सल्ला घेतला जात आहे.
सोने कसे वितळवणार?
- असामान्य कलाकुसरीचे किंवा पुरातन, दुर्मिळ असतील असे अलंकार सदैव जतन करुन ठेवण्यात येतील..
- वस्तू वितळविण्यापूर्वी व्यवस्थापन समितीच्या किमान तीन सदस्यांनी त्यांची पाहणी करतील.
- शासनाच्या अधिकाऱ्याच्या उपस्थितीत सदस्यांसमक्ष त्यांचे वजन करुन त्या सिलबंद करण्यात येतील
- वजन करण्यापूर्वी त्यावर खडे बसविलेले असल्यास ते काळजीपूर्वक त्याची संख्या चिठ्ठीसह कापडी पिशवीत मोहोरबंद करुन ते वेगळे ठेवण्यात येतील.
- वितळविण्यासाठीच्या अलंकाराची वाहतूक करण्यापूर्वी त्या वस्तूंचा आवश्यक तेवढा वाहतूक विमा उतरवण्यात यावा.
- पोलिस संरक्षणाची संपूर्ण व्यवस्था करण्यात यावी.
- या वस्तूंच्या सिलबंद पेट्या बंदिस्त व सुरक्षित जागेत ठेवण्यात येतील. ती बंदिस्त जागा मोहोरबंद करण्यात यावी.
- रिफायनरीत पोहोचल्यानंतरच सर्व पेट्या वाहनातून काढून त्यातील वस्तूंचे रिफायनरीमध्ये पुन्हा वजन करण्यात यावे
- वितळवल्यानंतर आलेल्या अशुद्ध धातूंचे दोन नमुने (तुकडे) काढून त्यापैकी एक नमुना (तुकडा) ताब्यात घेवून त्या नमुण्याच्या शुद्धतेची तपासणी इंडिया गव्हर्नमेंट मिंट, मुंबई यांचेकडून करुन घेण्यात येणार