धाराशिव: तुळजापूरची तुळजाभवानी ही कुलदैवत असल्यामुळे तुळजाभवानीच्या  दर्शनाला राज्यातील तसेच तेलंगणा, आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, राजस्थान यासह विविध राज्यातून भाविक येत असतात. कुलाचार केल्यानंतर देवीला सोने, चांदी, मौल्यवान अलंकार भेट देत असतात. या अलंकाराची मोजदाद सुरू असून त्यामध्ये 207 किलो सोने, 354 हिरे आणि 2586 किलो चांदी भक्तांनी दान केली आहे. 


सन 2009 पासून आजपर्यंत सोने,चांदी, मौल्यवान अलंकार यांची मोजदाद झाली नव्हती. जिल्हाधिकारी तथा संस्थानचे अध्यक्ष डॉ. सचिन ओंम्बासे यांच्या आदेशान्वये कडेकोट सुरक्षेत इन कॅमेरा सोन्याची मोजदाद सुरु आहे. विशेष म्हणजे दान आलेले सोने, हिरे खरे आहेत की खोटे हे तपासणीसाठी मंदिर प्रशासनाने सोनाराची नियुक्ती केली आहे.


सन 2009 नंतर जमा झालेल्या तुळजाभवानीच्या सोने, चांदी, मौल्यवान अलंकार यांची मोजदाद 7 जूनपासून  सुरु आहे. 12 जून पर्यंत 207 किलो सोने, 354 हिरे दान आले आहेत. अंदाजे 65 कोटी रुपयाचे सोने असून अंदाजे 20 लाख रुपयाचे हिरे दान आले आहे. तर 12 जून पासून आजपर्यंत या 8 दिवसात विविध पेटीमध्ये असलेले 2586 किलो चांदीची मोजणी झाली आहे. आजचा चांदीचा दर 73 हजार रुपये किलो असून 2586 किलो चांदीची किंमत अंदाजे 18 कोटी 87 लाख 78 हजार रुपये होते.


2009 पूर्वी वितळवलेले 139 किलो चांदी तसेच पूर्वीच्या ट्रेझरी मध्ये 200 किलो चांदी जमा आहे. सिंहासन, उंबरा, दोन अंबारी, चौरंग, विना वापराच्या विविध वस्तू यांची मोजदाद बाकी असून पुढील 4 दिवस ही मोजदाद होणार आहे. 


सोने, चांदी वितळवण्यास विरोध 


2001 ते 2005 या दरम्यान तुळजाभवानीच्या खजिना आणि जमादार खान्यातील अतिप्राचीन ऐतिहासिक सोन्या चांदीच्या वस्तू, मौल्यवान अलंकार, प्राचीन नानी यांचा अपहार झाला होता. राजे महाराजे यांनी देवीला अर्पण केलेले ऐतिहासिक पुरातन 71 नानी, 2 खडाव जोड, माणिक गायब झाले होते हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. सोने चांदी वितळवण्याच्या प्रक्रियेत संबधित दोषीचा अपहार दडवण्याचा प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असेपर्यंत दान आलेले सोने, चांदी वितळवण्यास पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष मंदिर संस्थान डॉ. सचिन ओंम्बासे यांना निवेदनद्वारे विरोध केला आहे.


सोने, चांदी वितळवल्यानंतर शुद्ध सोने, शुद्ध चांदी याची किंमत तसेच वजन समजणार आहे.


ही बातमी वाचा: