Dharashiv: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या तिजोरीतील सोने-चांदीचे गेल्या 2 दिवसांपासून मोजमाप सुरू आहे.  तब्बल 15 वर्षांनंतर भाविकांनी  तुळजा भवानी देवीला अर्पण केलेल्या दागिन्यांचे मोजमाप सुरू आहे. दरम्यान, या ऐवजाच्या मोजमापादरम्यान एक आश्चर्यकारक घटना घडली आहे, दागिन्यांचे मोजमाप सुरू असताना 354 हिरे भक्ताने दान केल्याचे समोर आले. या 354 हिऱ्यांची किंमत अंदाजे 30 ते 40 कोटी असल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु, इतक्या प्रमाणात हिरे एका भाविकाने दान केले की अनेक भाविकांनी याची माहिती अद्याप समोर आली नाही.


तुळजाभवानी मंदिरात दान अर्पण करण्याची एक पद्धत आहे. भाविक एका पाकिटामध्ये बंद करुन सोने-चांदीचे दागिने किंवा हिरे दानपेटीत टाकतात, त्यामुळे हे हिरे एकाच भविकाने दिली किंवा नेमके किती भाविकांनी दिले, याचा आकडा अद्याप समोर आला नाही. एवढ्या प्रमाणात देवीच्या दानपेटीत हिरे सापडणं सर्वांना आश्चर्यचकित करुन टाकणारं आहे, कारण याआधी तिरुपती मंदिर, शिर्डीचं साईबाबा मंदिर आणि सिद्धीविनायकला इतक्या प्रमाणात दान केलेलं आपण पाहिलं असेल, पण तुळजा भवानी मंदिरात इतक्या प्रमाणात हिऱ्यांच्या दानाची ही पहिलीच घटना असेल.


त्यात हे निदर्शनास आलेले 354 हिरे आकाराने छोटे असले तरी त्यांचे मूल्य अंदाज 30 ते 40 कोटी असल्याचं सांगण्यात येत असल्याने हे आणखी आश्चर्यकारक आहे. हे दान नेमकं केलं कोणी? याची माहिती समोर आली नाही. कदाचित सीलबंद पाकिटात भाविकाने दान केल्याने हे नजरेत आलं नसावं किंवा पाकिट सीलबंद असल्याने दानाची नोंद देखील करण्यात आला नसावी.


तुळजाभवानी देवीला नवसपूर्ती म्हणून अनेक भाविक सोने-चांदीच्या स्वरूपात दान अर्पण करतात. 15 वर्षानंतर सुरू करण्यात आलेली तिजोरीतील दान केलेल्या ऐवजाची मोजणी अजून महिनाभर चालणार आहे. आगामी एक महिन्यात जवळपास 200 किलो सोने आणि 4 हजार किलो चांदीचे मोजमाप करण्यात येणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे, त्यानंतर त्यांची शुद्धता तपासणी होणार आहे.


तुळजाभवानी मंदिरातील सोन्याचांदीच्या ऐवजाचे मोजमाप दररोज सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत सुरू असणार आहे. महिनाभर ही दागिन्यांची मोजणी सुरू असेल. भाविकांनी अर्पण केलेले सोने आणि चांदीचे दागिने मोजणी करुन त्यानंतर ते वितळवले जाणार आहे, जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थानचे अध्यक्ष डॉ. सचिन ओंबासे यांनी हा निर्णय घेतला आहे.


हेही वाचा:


Nashik Cycle Wari : नाशिक ते पंढरपूर सायकलवारी, 350 हून अधिक सायकलपटूंचा सहभाग, पंढरपूरला सायकल रिंगण