धाराशिव : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांना दोन प्रश्न विचारले आहेत. देवेंद्र फडणवीसांवर टीका करून मराठा आरक्षण मिळणार आहे का? असं राधाकृष्ण विखे पाटलांनी विचारलं. तसेच मराठा समाजाला आरक्षण देता येत नाही, ही शरद पवारांनी जाहीर भूमिका मांडली. मराठ्यांना आरक्षण द्यायला पवारांचा विरोध आहे. त्यावर मनोज जरांगे पाटील का बोलत नाहीत? असाही प्रश्न विखे पाटील यांनी केला. विखे पाटील धाराशिवमध्ये माध्यमांशी बोलत होते.
एकनाथ शिंदेच नाही तर सरकारमधील सर्वच मराठा नेत्यांना संपवण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी केला आहे. त्यावर राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीसावर टीका करणे, मराठा आरक्षणाला फडणवीसांचा विरोध आहे असं सांगणे आणि त्याला जातीय रंग देणे हा प्रकार चुकीचा असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. फडणीसांच्या काळातच मराठ्यांना आरक्षण मिळालं होतं. महायुतीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनीच मराठा आरक्षणाबाबत भूमिका घेतली होती. आजही महायुतीची तीच भूमिका आहे असं विखे पाटील म्हणाले.
शरद पवारांवर का बोलत नाही?
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनीच आपल्याला आरक्षण दिलं आणि ते सुप्रीम कोर्टापर्यंत टिकलं. अडीच वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे उद्धव ठाकरे असतील, त्यांचे नेते शरद पवार असतील, त्यांनी आरक्षणासंदर्भात योग्य भूमिका न घेतल्याने आरक्षण घालवलं. स्वतः शरद पवारांनी अनेक वेळा सांगितले की मराठ्यांना आरक्षण देता येत नाही. त्याबद्दल जरांगे पाटील कधीच बोलत नाहीत. फक्त फडणवीस यांच्यावर टीका केली की आरक्षण मिळणार आहे का?"
मराठा आंदोलनासाठी धाराशिवमध्ये जोरदार तयारी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्टला मुंबईच्या आझाद मैदानात होणाऱ्या आंदोलनाची धाराशिवमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये चावडी बैठका घेत 29 ऑगस्टच्या आंदोलनाबद्दल मराठा बांधव जनजागृती करत आहेत.
मुंबईतील आंदोलनासाठी आतापर्यंत दहा हजार गाड्यांचं बुकिंग झालं आहे. मनोज जरांगेंचा फोटो असलेले आणि त्यावर 'चलो मुंबई' आशा आशयाचे बॅनर आणि पॅम्प्लेट छापण्याची प्रक्रिया सुरु आहे.
ही बातमी वाचा: