Omraje Nimbalkar: अधिकाऱ्यांना वाढलेल्या ढेऱ्या कमी करण्यासाठी व्यायाम व योगा करा, असा सल्ला खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अधिकाऱ्यांना भर बैठकीत दिला. हे शक्य नसेल तर राजीनामा द्या, असंही ओमराजे निंबाळकर  असं सांगितले. ओमराजे यांनी पोकरा योजनेच्या आढावा बैठकीत शासकीय अधिकारी यांच्या वाढलेल्या ढेऱ्या पाहून बीपी शुगरवाल्यांनो जरा व्यायाम योगा करत जा असा सल्ला दिला आणि नाही जमत तर राजीनामा द्या असे सांगितले. धाराशिवमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या अंतर्गत विविध योजनेचा आढावा खासदार ओमप्रकाश निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी घेतला. सदर आढावा बैठक जिल्हा नियोजन विभागाच्या सभागृहात पार पडली. 


लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे कार्यरत असलेले कृषी पर्यवेक्षक जी. एस. सगर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची घटना 1 मे रोजी मध्यरात्री घडली. ते निलंगा तालुक्यातील हत्तरगा येथील मूळचे रहिवासी असून सध्या सास्तुर येथे कृषी पर्यवेक्षक म्हणून कार्यरत होते. निधनाची माहिती कृषी विभागाच्या आढावा बैठकीत खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर व आमदार कैलास घाडगे पाटील यांना त्यांच्या संबंधित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली असता खासदार राजे निंबाळकर यांनी दुःख व्यक्त करत अधिकाऱ्यांनी आपल्या तब्येतीसाठी आपली वाढलेली ढेरी कमी करावी म्हणून योगा आणि व्यायाम कण्याचा सल्ला दिला.


धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यामध्ये या योजनेअंतर्गत विविध कामांना शासनामार्फत 100 ते 65 टक्क्यापर्यंत अनुदान उपलब्ध करून दिले जाते. ही योजना शेतकऱ्यांच्या हिताची असून यामुळे शेतकऱ्यांना थेट लाभ होतो. सिंचनासाठी अनुदान तत्वावर पी.व्ही.सी. पाईप, ठिबक सिंचन संच, तुषार सिंचन तसेच मिनी स्प्रिंकलर संच विद्युत पंप, पॉली हाऊस, फळबाग लागवड, शेतीचे यांत्रीकीकरण तसेच शेतीउपयोगी अवजारे आदींसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. मागील एक महिन्यापासून  खासदार पाठपुरावा करत होते. सुमारे 3 हजार प्रस्ताव निकाली काढून शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले आहे. 


धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आज रोजी कामे पूर्ण करून अनुदानाच्या प्रतीक्षेत 3727 इतके प्रस्ताव आहेत आणि  त्यापैकी ठिबक सिंचन व तुषार सिंचनाचे 3129 व इतर प्रस्ताव 598 एवढे प्रलंबित प्रस्ताव आहेत. कृषी विभागातील अधिकऱ्यांच्या दप्तर दिरंगाईमुळे सदर प्रस्ताव वेगवेगळ्या डेस्क वरती 5977 प्रस्ताव मंजूरीच्या प्रतिक्षेत असून अद्याप कामे पूर्ण न केल्या कारणाने शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही. डिसेंबर 2022 ते 31 मार्च 2023 पर्यंतचे अनेक प्रकरणे वेगवेगळ्या डेस्कवर प्रलंबित आहेत.  


ही बाब खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या लक्षात आल्यानंतर नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या आढावा बैठक घेवून संबंधित अधिकाऱ्यांना सर्व प्रकरणे 7 दिवसाच्या आत तत्काळ निकाली काढण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सुचना करण्यात आल्या. कोणताही पात्र शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार नाही याचे खबरदारी घेण्याबाबत सूचना केली. तसेच कृषीमंत्री यांनाही 9704 शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रस्ताव संदर्भात निधी उपलब्ध करून देण्यासाठी विनंती करणार असल्याचे सांगितले. सदर बैठकीस जिल्हा कृषी अधीक्षक माने ,कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.