Bird Flu : धाराशिवमध्ये (Dharashiv) कावळ्यापाठोपाठ कोंबड्यांनाही (Chickens) बर्ड फ्लूचा संसर्ग पसरल्याचे उघडकीस आले आहे. बर्ड फ्ल्यूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर आले असून ढोकी गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावरील कोंबड्या नष्ट केल्या जाणार आहेत. जलद कृती दलाच्या माध्यमातून कोंबड्या नष्ट करायला सुरुवात झाली आहे. धाराशिव तालुक्यातील ढोकी येथे कावळ्यांद्वारे ‘बर्ड फ्यू’ झाल्याचे निदर्शनास आले होते. यानंतर प्रशासनाच्या माध्यमातून परिसरातील किमी अंतरावरील गावांतील कोंबड्यांचे देखील सर्वेक्षण करण्यात आले होते. यानंतर कोंबड्यांचे स्वॅब तपासणीसाठी भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. या तपासणीत कोंबड्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने बुधवारपासून पाच पथकांच्या माध्यमातून कोंबड्या नष्ट करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
पशुसंवर्धन विभागाचे आवाहन
कोंबड्यांचा अहवाल बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आल्यानंतर यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सर्वेक्षणात आढळून आलेल्या तब्बल ८५० हून अधिक कोंबड्या नष्ट करण्यात येणार आहेत. पाच पथकांच्या माध्यमातून हे काम बुधवारपासून सुरू करण्यात आले आहे. ढोकी गावापासून एक किलोमीटर अंतरावरील कोंबड्या नष्ट केल्या जाणार आहेत. त्यानंतर तीन किलोमीटर परिसरातील कोंबड्याचे सॅम्पल घेतले जाणार आहे. कोंबड्या लपवून ठेवू नका किंवा नातेवाईकांना देऊ नका, नष्ट करायला मदत करा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे. कोंबड्यांना संसर्ग आढळून आल्याने ढोकी गावात मास विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे.
वाशिममध्येही बर्ड फ्लूचा संसर्ग
वाशिमच्या कारंजा तालुक्यातील खेर्डा जीरापुरे येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूची लागण झाल्यानंतर वाशिम जिल्हा प्रशासनाने तातडीनं उपाययोजना सुरु केल्या. बर्ड फ्लू बाधित सर्व कोंबड्यां आणि खाद्य शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे. यामुळे मागील 24 तासात वाशिम जिल्ह्यात इतरत्र कुठेही बर्ड फ्लूची लागण झाल्याची नवीन घटना उघडकीस आली नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या