धाराशिव : गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या धाराशिवमधील ऑपरेशन टायगरला अद्याप यश आलं नाही. गेल्या दोन महिन्यांपासून दोन रेस्क्यू टीम यासाठी काम करत आहेत. त्यासाठी आतापर्यंत आठ ते नऊ लाखांचा खर्च आला आहे. तरीही वनविभागाला वाघाचा ठावठिकाणा लागत नाही. या वाघाच्या शोधासाठी डॉग रेस्क्यू, थर्मल ड्रोन, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा वापर करण्यात आला. वाघाच्या रेस्क्यूसाठी तीन वेळा डार्ट गनचा वापर करण्यात आला. पण तरीही हाती अपयश आलं.

यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून आलेल्या वाघाचा धाराशिवमध्ये मुक्त वावर असल्याचं दिसून येतंय. या वाघाने आतापर्यंत 40 हून जास्त जनावरांचा फडशा पाडला आहे. आल्यापावली टीपेश्वरहून आलेला वाघ परत जाईल असा अंदाज होता. मात्र वाघाचा मुक्काम वाढला. त्यामुळे पकडण्याचे आदेश देण्यात आले.

दोन टीमकडून शोध 

डॉ. खोब्रागडे यांच्या नेतृत्वातील चंद्रपूर अभयारण्यातली टीम वाघाच्या सर्च ऑपरेशनसाठी धाराशिवमध्ये दाखल झाली. मात्र रिकाम्या हाती परतावे लागले. त्यानंतर ऑपरेशन टायगरची जबाबदारी पुण्यातील रेक्यू टीमकडे सोपवण्यात आली. त्या टीममध्ये डॉग स्कॉड, थर्मल ड्रोन, ट्रॅप कॅमेरे सीसीटीव्ही यांच्यासह शोध मोहीम राबवली गेली. मात्र वाघाला पकडण्यात वनविभाग अपयशी ठरला. वाघाच्या शोध मोहिमेवर जवळपास आठ ते नऊ लाखाचा खर्च झाल्याची माहिती ही वनाधिकाऱ्यांनी दिली. 

वाघाला रेस्क्यू करण्याची पहिल्या दोन महिन्यांची मुदत संपली असून नव्याने मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ आणखी दोन महिन्यांची असून ती 30 एप्रिलपर्यंत असणार आहे. त्यामुळे वाघाला पकडण्यात कधी यश मिळणार हे पहावे लागेल.

यवतमाळ ते धाराशिव 500 किलोमीटरचा वाघाचा प्रवास

धाराशिव जिल्ह्यातील रामलिंग अभयारण्य आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी भागात या वाघाचा वावर असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील वनविभागाचे अधिकारी वाघाच्या शोधात आहेत. वाघाच्या पायाचे ठसे ट्रॅप कॅमेऱ्यातली चित्र यावरून वाघ कुठल्या दिशेने मार्गक्रमण करतोय याचा शोध घेतला जातोय. 

वाघ आता मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवर असला तरी तो विदर्भातील टिपेश्वर येथून आला. यवतमाळ आणि धाराशिव याचे अंतर पाहिलं तर साधारणपणे पाचशे किलोमीटरचा हा प्रवास आहे. धाराशिवच्या रामलिंग अभयारण्यात बिबट्यासाठी लावलेल्या कॅमेरात वाघाचे दर्शन झालं. धाराशिवच्या दुष्काळी पट्ट्यात वाघ येणे ऐतिहासिक होतं, पण सोबतच तेवढ्याच काळजीच. त्याला कारण होतं रामलिंगच्या अभयारण्यात असलेलं अपुरे वनक्षेत्र. 

ही बातमी वाचा: