पुणे : आगामी 'तान्हाजी' या चित्रपटात तानाजी मालुसरे यांना साखळदंडाने बांधल्याचे दाखविणारे दृश्य आहे. या दृश्यावर तान्हाजी मालुसरे यांचे 14 वे वंशज प्रसाद मालुसरे यांनी आक्षेप घेतला आहे. आतापर्यंतच्या तान्हाजी मालुसरे यांच्या इतिहासात अशाप्रकारचा कोठेही उल्लेख नाही. त्यामुळे चित्रपटातील हा भाग वगळण्यात यावा, अशी मागणी प्रसाद मालुसरे यांनी केली.


तान्हाजी या चित्रपटात दाखविण्यात येणारा इतिहास हा तान्हाजी मालुसरे यांचा इतिहास म्हणून यापुढील काळात ओळखला जाईल. तान्हाजी चित्रपटाच्या ट्रेलरमधील काही दृश्यात तान्हाजी मालुसरे यांचे हात साखळदंडाने बांधलेले दाखविण्यात आले आहे. पण आतापर्यंतच्या तान्हाजी मालुसरे यांच्या इतिहासात अशा प्रकारचा प्रसंग कुठेही वाचण्यात अथवा ऐकण्यात आला नाही. त्यामुळे हा प्रसंग या चित्रपटातुन वगळण्यात यावा अशी मागणी प्रसाद यांनी केली. तसेच या चित्रपटात इतर कुठले आक्षेपार्ह दृश्य नाहीत याची खातरजमा करण्यासाठी प्रदर्शित होण्यापूर्वी हा चित्रपट मालुसरे यांच्या वंशजांना दाखविण्यात यावा अथवा चित्रपटाची स्क्रिप्ट वाचण्यास द्यावी अशी मागणीही प्रसाद मालुसरे यांनी केली.

राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांचाही आक्षेप -
बहुचर्चित चित्रपट 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला. हा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलं होतं. त्यामध्ये त्यांनी दिग्दर्शकांना चित्रपटात लवकरात लवकर बदल करण्यास सांगितले आहेत. ट्विटमध्ये ते म्हणतात, 'ओम राऊत तुमच्या तान्हाजी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला, त्यामध्ये काही प्रसंगात तुम्ही ज्या अनैतिहासिक आणि चुकीच्या गोष्टी घुसडल्या आहेत. त्यामध्ये लवकरात लवकर बदल करा. अन्यथा यामध्ये मला माझ्या पद्धतीने लक्ष घालावे लागेल.' एवढच नाहीतर ट्विटमध्ये आव्हाडांनी पुढे म्हटलं आहे की, 'याला धमकी समजली तरी चालेल'.


काय आहे तान्हाजी चित्रपट?
स्वराज्य निर्मितीसाठी कामी आलेला एक मावळा तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावर या चित्रपटाची कथा आधारीत आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगण तानाजी ही व्यक्तीरेखा साकारणार आहे. त्याच्यासोबतच बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार मंडळीही यात झळकली आहेत. यात मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता अजिंक्य देवदेखील भूमिका साकरतोय. या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊतने केलं आहे. हा चित्रपट घोषणेपासूनच चर्चेत राहिला आहे. या चित्रपटात सैफ अली खान हा राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत आहे. 150 कोटी रुपयांच्या बजेट असलेला हा चित्रपट 10 जानेवारी 2020 ला प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा - Tanhaji Marathi Trailer | 'तानाजी'चा मराठी ट्रेलर प्रदर्शित, नेटिझन्स मात्र निराश