Sujay Vikhe Patil vs Ram Shinde : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) आणि भाजप उमेदवार खा. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे. हा अंतर्गत वाद मिटवण्यासाठी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मध्यस्थी करावी लागणार आहे. 


यासाठी सुजय आणि राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर राम शिंदे हे तातडीने मुंबईकडे निघाले आहेत. रात्री साडेआठ वाजता त्यांच्यामध्ये बैठक होणार असल्याचे समजते. 


विखे - शिंदे वाद नेमका काय? 


विखे-शिंदे यांच्यातील वाद हा आताच नसून मागील विधानसभा निवडणुकीतील आहे. ज्यावेळी विखे काँग्रेस सोडून भाजपात आले त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या आमदारांचा पराभव झाला होता. या पराभवाला विखे कुटुंबियांचे जबाबदार असल्याचा आरोप करत राम शिंदे (Ram Shinde) यांनी पाच आमदारांसोबत पक्ष नेतृत्वाकडे तक्रार केली होती. 


दक्षिण नगरमधून राम शिंदे होते इच्छुक 


त्यात कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात राम शिंदे, राहुरी विधानसभा मतदारसंघात शिवाजी कर्डीले , नेवासा विधानसभा मतदारसंघात बाळासाहेब मुरकुटे यांचा पराभव झाला होता. तेव्हापासून राम शिंदे आणि सुजय विखे (Sujay Vikhe), राधाकृष्ण विखे यांच्यात शीतयुद्ध सुरू होते. वेळोवेळी दोघांनीही एकमेकांवर जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळालं होतं त्यातच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राम शिंदे हे देखील दक्षिण नगर जिल्ह्यातून उमेदवारी करण्यासाठी इच्छुक होते त्यामुळे दोघांमध्ये कायमच कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळाला. 


सुजय विखेंनी अप्रत्यक्षपणे मागितली होती माफी


राम शिंदे यांनी अनेक वेळेला सुजय विखे यांचे कट्टर विरोधक निलेश लंके यांच्या कार्यक्रमाला हजेरी देखील लावली होती. त्यामुळे दोघांतील संघर्ष हा आणखी तीव्र झाला होता मात्र भाजपनं अहमदनगर शहरात घेतलेल्या निवडणूक पूर्व तयारी बैठकीत सुजय विखे यांनी अप्रत्यक्षपणे माफी मागितली होती. मागील पाच वर्षाच्या काळात जर चुकून कोणाची मन दुखावले असेल तर ते मी जाणीवपूर्वक दुखावलेले नाही मोठ्या मनाने आपण मला माफ कराल, असं सुजय विखे यांनी म्हटलेलं होतं. 


देवेंद्र फडणवीस वाद मिटवणार?


त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी राम शिंदे यांची भेट घेतली होती. त्यांच्यातील संघर्ष हा मिटला असावा, असं वाटत असतानाच राम शिंदे यांनी पुन्हा माध्यमांशी बोलताना आमच्या ज्या मुद्द्यांवर चर्चा झाली ते मुद्दे राज्यस्तरावरील असून याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लवकरच बैठक होईल, असं म्हटलं होतं. त्यानुसार आज साडेआठ वाजता सागर बंगल्यावर राम शिंदे, सुजय विखे, राधाकृष्ण विखे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात संयुक्त बैठक होणार असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे. आता देवेंद्र फडणवीस चाणक्य नीती वापरून विखे-शिंदे वाद मिटवणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


आणखी वाचा 


विजय शिवतारे पुरंदरच्या भूमीत जन्माला आलेला दिलेर खान; बार्गेनिंग पॉवर वाढवून पाच-पन्नास लाख रुपये मिळवण्याचा प्रयत्न ; अमोल मिटकरींचे जोरदार प्रत्युत्तर