बारामती : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वृत्तपत्र जाहिरात खर्च वगळता फक्त टीव्ही आणि रेडिओ वाहिन्यांवर जाहिरातींसाठी गेल्या पाच वर्षात दिवसाला तब्बल 85 हजार रुपये शासकीय तिजोरीतून खर्च केल्याची माहिती नुकतीच माहिती अधिकारातून उघडकीस आली आहे. बारामती तालुक्यातल्या सोमेश्वरनगर येथील नितीन यादव यांनी ही माहिती मागवली होती.

विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना त्यांच्या वाढदिवसाला वायफळ खर्च न करण्याचे आवाहन केले होते. 'वायफळ खर्च न करतो तो पैसा मुख्यमंत्री सहायता निधीला द्या!, वाढदिवसानिमित्त कुठेही होर्डिंग, बॅनर्स, जाहिराती दिसणार नाहीत, याची प्रत्येक आमदार, खासदार, पदाधिकारी यांनी काळजी घ्या', असं म्हणणाऱ्या फडणवीस यांच्या काळात सरकारी तिजोरीतून पाच वर्षात 15 कोटी 51 लाख रुपयांचा चुराडा फक्त टीव्ही आणि रेडिओच्या जाहिरातींवर करण्यात आल्याची माहिती या माहिती अधिकारातून उघड झाली आहे.



बारामतीचे नितीन यादव यांनी माहिती अधिकारात माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय मार्फत तत्कालीन (फडणवीस यांच्या कार्यकाळातील) महाराष्ट्र शासनाचा टीव्ही आणि रेडिओ वाहिन्यांवरील जाहिरातीसाठी करण्यात आलेल्या खर्चाचा तपशील मागवला होता. यात काही तपशील उघडकीस आले आहेत. फडणवीस सरकारने 2017-18 साली टीव्ही वाहिन्यांवरील जाहिरातींवर तब्बल 5,99,97,520 रुपये खर्च केले असल्याची माहिती मिळाली आहे. तर याच वर्षी रेडिओ जाहिरातींवर 1 कोटी 20 लाख 69 हजार 877 रुपयांचा खर्च केला आहे.

फडणवीस सरकारच्या काळात 2013-2014 रेडिओ वाहिन्यांवर जाहिरातीवर केलेला खर्च 2013-2014 साली 59, 96, 291 रुपये इतका होता, तो वाढून 2018-2019 साली 1,85,72, 887 झाल्याचं दिसत आहे. तर टीव्ही वाहिन्यांवर जाहिरातीसाठी केलेला खर्च 2013-2014 साली 53,25,730 रुपये होता, तो 2018-2019 साली वाढून तब्बल 2,84, 48, 317 रुपये झाल्याची माहिती या माहिती अधिकारातून मिळाली आहे.

पाच वर्षाचे 15 कोटी 51 लाख रुपये जाहिरातींवर खर्च करण्यात आले असून दिवसाचा हिशोब काढला असता 85 हजार रुपये खर्च केला असल्याचा दावा यादव यांनी केला आहे.