नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विदर्भाला आणि खासकरुन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जोरदार धक्का दिला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यासाठी तर तत्कालीन अर्थमंत्री या नात्याने सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या वार्षिक योजनांना नियमाच्या बाहेर जाऊन भक्कम निधी दिला होता. मात्र आता तसं चालणार नाही, सर्व जिल्ह्यांना ठरलेल्या सूत्राप्रमाणेच निधी दिला जाईल, असं अजित पवारांनी आज ठणकावून सांगितलं आहे.


वर्ष 2020 -21 साठी विविध जिल्ह्यांच्या वार्षिक योजना तयार करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु असून त्याच्याच आढावा अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी सुरु केला आहे. आज नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांचा आढावा त्यांनी घेतला. त्यानंतर नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या वार्षिक योजनेत मागील वर्षाच्या तुलनेत भरीव कपात केली जाणार आहे, असे संकेत त्यांनी दिले आहेत. चालू आर्थिक वर्ष म्हणजेच वर्ष 2019-20 साठी नागपूर जिल्ह्याची वार्षिक योजना 525 कोटी रुपयांची असताना आगामी आर्थिक वर्षासाठी नागपूर जिल्ह्याची वार्षिक योजना फक्त 299 कोटी रुपयांची असणार आहे, असं अजित पवारांनी सांगितलं आहे.


अजित पवारांच्या सूत्रानुसार नागपूर जिल्ह्याला पहिल्याच वर्षात 226 कोटींचा फटका बसला आहे. तर चंद्रपूर जिल्ह्याची चालू आर्थिक वर्ष म्हणजेच 2019 -20 ची वार्षिक योजना 375 कोटी रुपयांची होती. मात्र अजित पवारांच्या सूत्रानुसार आता ती फक्त 223 कोटींची असणार आहे. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर जिल्ह्याला ही तब्बल 152 कोटींचा फटका बसणार आहे.


अर्थमंत्री म्हणून कोणत्याही जिल्ह्याला विशेष न्याय आणि इतर जिल्ह्यावर अन्याय असं करून चालणार नाही. नागपूर, चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग सारख्या जिल्ह्यांना मागील सरकारने दिलेला जास्तीचा निधी लगेच थांबवता आला असता. मात्र आम्हाला सुडाचं राजकारण करायचं नाही, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान माझ्या निर्णयाने नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत आणि चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे नाराज झाले असले तरी आता निधीचं वाटप नियम आणि सूत्रानुसारच होईल, असंही अजित पवार यांनी सांगितले.