मुंबई : भाजपसोबतची युती तोडून शिवसेना सत्तेत सहभागी झाली. मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे विराजमान झाले. पण विधिमंडळाच्या 2020च्या कॅलेंडरवर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाच फोटो छापण्यात आला आहे. एकट्या फडणवीसांचाच नाही तर जुन्याच मंत्रिमंडळातील सदस्यांचे देखील फोटो या कॅलेंडरवर आहेत. त्यामुळं सरकार बदललं असलं तरी त्याची खबरबात प्रशासनाला नाही का, असा सवाल आता विचारला जात आहे. दरम्यान हे कॅलेंडर मी पुन्हा येईन असा विश्वास असणाऱ्यांनी छापलं होतं, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. तर विधीमंडळाकडून हे कॅलेंडर जुनं असल्याचं सांगण्यात आलं आहे. विधानमंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार सन 2019 च्या कॅलेन्डरमध्ये एक महिना जादा जानेवारी 2020 चा छापला आहे. त्यामुळे ते फोटो त्यावेळी म्हणजे जानेवारी 2019 मध्ये छापले आहेत. सन 2020 च्या कॅलेन्डर चे मुद्रण अद्यापही झालेले नाही. ते प्रुफ स्टेजला आहे, असे विधानभवन प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

महाराष्ट्र विधानमंडळाच्या कॅलेंडरवर देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री दाखवण्यात आलं आहे. जानेवारी 2020 चे कॅलेंडरचे पेज आहे मात्र त्यावर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्यात आला आहे. एवढंच नाही तर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून हरिभाऊ बागडे यांचा फोटो छापण्यात आला आहे. या कॅलेंडरवर राधाकृष्ण विखे पाटील यांना विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि धनंजय मुंडे यांना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते दाखवण्यात आलं आहे.

बऱ्याच राजकीय नाट्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आलं आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी स्थापन झाली. या सरकारमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री तर अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. मात्र 2020 च्या कॅलेंडरवर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपात आले आहेत याचाही कॅलेंडर छापणाऱ्यांना पत्ता नाही. कारण त्यांचा उल्लेख विरोधी पक्षनेते म्हणून करण्यात आला आहे. तर धनंजय मुंडे हे सध्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री आहेत. मात्र त्यांना कॅलेंडरवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दाखवण्यात आलं आहे.


संबंधित बातम्या 

तान्हाजीच्या दृश्यांवर मॉर्फिंग, शिवराय मोदी तर तान्हाजी अमित शहा; दिल्ली निवडणुकीपूर्वी व्हिडीओ व्हायरल 

Tanhaji Spoof Video | छत्रपती शिवाजी महाराजांच्या तुलनेचं समर्थन नाही, वादग्रस्त व्हिडीओ प्रकरणी भाजपच्या राम कदमांची प्रतिक्रिया

Tanhaji Political Spoof | तान्हाजीच्या पॉलिटिकल व्हिडीओमुळे संभाजीराजे छत्रपती आक्रमक, व्यक्तिरेखांना मोदी, शाहांचे चेहरे लावल्याने वाद