नागपूर : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत शेतकऱ्यांच्या 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा केली. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतून ही कर्जमाफी करण्यात येणार आहे. 30 सप्टेंबर 2019 पर्यंतचे थकीत कर्ज माफ करणार असल्याची घोषणा ठाकरे यांनी केली. मात्र या घोषणेनंतर विरोधी पक्षाने सरकारचा निषेध करत सरसकट कर्जमाफीची मागणी करत सभात्याग केला. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनेतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली.


ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नंतरच कर्ज आम्ही पुनर्गठित करु असं म्हणत आहे. मात्र मागणी ही पुनर्गठित करण्याची नाही तर मागणी ही सरसकच कर्जमाफी करण्याची आहे. 2 लाख कर्जमुक्त होणार, पण सातबारा कोराचं काय? आपण 2019 चं सांगत आहात मात्र शेतकरी खरा अडचणीत ऑक्टोबर महिन्यामध्ये आला. एकीकडे 25000 नुकसान भरपाईचा विश्वासघात, सातबारा कोरा नाही, सरसकट कर्जमाफी नाही. या विश्वासघातामुळे आम्ही सरकारचा निषेध करतो, असे फडणवीस म्हणाले. यानंतर भाजपने सभात्याग केला.

सभात्याग केल्यानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की,  या तिघाडी सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की, सरसकट कर्जमाफी केली जाईल आणि सातबारा कोरा केला जाईल. मात्र असं झालं नाही. ही कर्जमाफी देखील उधारीची आहे, असे फडणवीस म्हणाले.

फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना कर्जमाफीची घोषणा केली.  ज्याप्रकारे जनादेशाचा विश्वासघात करत हे सत्तेवर आले तसेच विश्वासघाताची मालिका सरकारने सुरु ठेवली आहे.  अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली नाही. तोंडाला पानं पुसली आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

फडणवीस म्हणाले की, आमच्या सरकारने दीड लाख सरसकट कर्जमाफी दिली होती. त्यातून सरकारी कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी वगळले होते. मात्र याच्या घोषणेत कुठलेच निकष किंवा स्पष्टता नाही. ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीमुळे संपूर्ण राज्यातील शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, तो आता कर्ज भरू शकणार नाही, त्यांना या योजनेचा लाभ नाही, यावर यांच्या कर्जाचं पुनर्गठन करू असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे, असे फडणवीस म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, एकही नवी घोषणा विदर्भासाठी झालेली नाही, विदर्भातील शेतकऱ्यांची घोर निराशा झालेली आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांची घोषणा आम्हीच केली होती, असे फडणवीस म्हणाले.

हेही वाचा- शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा



आश्वासन दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीने पूर्ण होणार नाही : राजू शेट्टी

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं  आश्वासन सरकारनं दिलं होतं. हे आश्वासन दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीने पूर्ण होणार नाही, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. यामध्ये 30 सप्टेंबरपर्यंत 2019 पर्यंत कर्जमाफी करण्याचा निर्णय हा वास्तविक पाहता बरोबर नाही. कारण राज्यात दुष्काळ त्यानंतर नापिकी, महापूर, ओला दुष्काळाने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अवकाळी पाऊस आणि महापुरामुळे ज्या पिकांचं नुकसान झालं आहे. त्या पिकांवर काढलेल्या पीककर्जाची मुदत 30 जून 2020 आहे. त्यामुळं थकबाकी असण्याचा विषयच नव्हता. त्यामुळे ज्या पिकांचं नुकसान झालं आहे, त्या पिकांना ना कर्जमाफी मिळाली ना फायदा मिळाला. त्यामुळं त्यांचं नुकसान झालं, बर्बाद झाले ते वंचित राहिले. नेमकी ही कर्जमाफी कुणाला मिळणार हा प्रश्न आहे. याबाबत आकडेवारी तपासावी लागेल. यात किती लाभधारक बसतात. पण नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी जर असेल तर ते शेतकरी या योजनेत बसणारच नाहीत, असेही शेट्टी म्हणाले.

काय केली उद्धव ठाकरेंनी घोषणा

शेतकऱ्यांच्या 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतून ही कर्जमाफी करण्यात येणार आहे. 30 सप्टेंबर 2019 पर्यंतचे थकीत कर्ज माफ करणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. बदलतं हवामान, अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे या त्रासातून शेतकऱ्याला मुक्ती देण्यासाठी शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंत कर्ज माफ करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात केली. मार्च 2020 पासून याची अमलबजावणी करण्यात येणार आहे. जे शेतकरी नियमित कर्ज फेडतात त्यांच्यासाठीही चांगली योजना आम्ही राबवणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. कर्जमाफीची योजना पारदर्शकपणे राबवली जाणार असून प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा होणार आहे. कोणत्याही अटीशर्ती विना ही कर्जमाफी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.